पंजाबमध्ये आप नेत्यावर गोळीबार, प्रकृती गंभीर
वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाबच्या फाजिल्का जिल्ह्यातील जलालाबादमध्ये आम आदमी पक्ष आणि शिरोमणी अकाली दलाच्या कार्यकर्त्यांदरम्यान झटापट झाली आहे. हा प्रकार एका ग्रामपंचायत कार्यालयात घडला आहे. या झटापटीदरम्यान गोळीबार देखील झाला असून यात आम आदमी पक्षाचे दोन कार्यकर्ते जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
फाजिल्कामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होणार आहे. आपचे समर्थन प्राप्त सरपंच पदाचे उमेदवार मनदीप बरार यांच्या तक्रारीमुळे शिरोमणी अकाली दलाचा पाठिंबा प्राप्त असलेल्या उमेदवाराचा अर्ज रद्द होणार असल्याचा संशय वरदेव सिंह नोनी मान यांच्या गटाला होता. बरार हे मुहम्मदवाला गावातून निवडणूक लढवत आहेत. तर नोनी मान यांच्या गटावर जमीन बळकाविल्याचा आरोप झाला आहे.
मनदीप बरार आणि मान गटादरम्यान हिंसक झटापट झाली आहे. यादरम्यान गोळीबार देखील झाला. मनदीप बरार यांना गोळी लागली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपीचे मनदीप यांच्यासोबत जुने वैमनस्य होते अशी माहिती फाजिल्काचे पोलीस अधीक्षक वरिंदर सिंह बरार यांनी दिली आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपींच्या विरोधात कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी म्हटले आहे.