आपचे नेते अमित पालेकर यांची जुने गोवे पोलिसांकडून चौकशी
पणजी : आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर यांची जुने गोवे पोलिसांनी काल बुधवारी कसून चौकशी केली. सराईत गुन्हेगार सिद्दीकी ऊर्फ सुलमान खान याच्याविऊद्ध नोंदवलेल्या शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुह्याच्या तपासाखाली ही चौकशी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सुलेमान खान याने गुन्हे शाखेच्या कोठडीतून पलायन केल्यानंतर त्याच्यासोबत गेलेला कॉन्स्टेबल अमित नाईक याला सुलेमानने पिस्तुलाचा धाक दाखवला होता, असे चौकशीअंती अमित नाईक याने सांगितले होते. त्यामुळे सुलेमानविऊद्ध शस्त्र बाळगणे तसेच धमकी देणे याबाबतही गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. याबाबत अमित पालेकर यांचीही चौकशी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अमित पालेकर यांनी चौकशीनंतर सांगितले की, पोलिसांना आपण चौकशीदरम्यान सहकार्य करीतच आलेलो आहे. परंतु या चौकशीदरम्यान पुन्हा पुन्हा यापूर्वी झालेल्या चौकशीविषयीच विचारणा होत आहे. आजही चौकशीसाठी बोलावून पोलिसांनी यापूर्वी विचारलेली माहितीच विचारली. पोलिसांकडून केवळ सतावणाक सुरू असल्याचा आरोपही अमित पालेकर यांनी केलेला आहे.