For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीतील आप-काँग्रेस जागावाटप प्रक्रिया पूर्ण

07:00 AM Feb 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीतील आप काँग्रेस जागावाटप प्रक्रिया पूर्ण
Advertisement

4/3 फॉर्म्युल्यावर एकमत : गोवा, गुजरात, हरियाणासंबंधीही बोलणी

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात युती झाल्यानंतर आता आम आदमी पार्टी (आप) आणि काँग्रेसमध्येही युती होताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही युती फक्त दिल्लीपुरती मर्यादित नसून गुजरात, गोवा, हरियाणा आणि चंदीगडमध्येही दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहेत. पंजाबमध्ये दोन्ही पक्ष परस्पर संमतीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या करारानुसार दिल्लीत 4/3 फॉर्म्युल्यावर निवडणूक लढवली जाईल. आम आदमी पार्टी नवी दिल्ली, दक्षिण दिल्ली, पश्चिम दिल्ली आणि उत्तर-पश्चिम दिल्ली या चार जागांवर निवडणूक लढवणार असून काँग्रेसला पूर्व दिल्ली, उत्तर-पूर्व आणि चांदनी चौक या मतदारसंघांमध्ये उमेदवार उतरवण्याची संधी मिळेल.

Advertisement

‘आप’ने दिल्लीबरोबरच अन्य राज्यांमध्येही एकजुटीने लढण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानुसार गुजरातमध्ये दोन आणि हरियाणात एक जागा ‘आप’ला देण्याचे मान्य करण्यात आल्याचे समजते. गुजरातमधील भरूच आणि भावनगर या जागांवर आप निवडणूक लढवणार आहे. याशिवाय हरियाणाची एक जागाही आपच्या वाट्याला येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदीगडची जागा काँग्रेसला देण्याबाबत करार झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर येथे ‘आप’चा महापौर झाला असला तरी करारानुसार येथे काँग्रेसला पाठिंबा देण्याचे ‘आप’ने मान्य केले आहे. दुसरीकडे ‘आप’ने दक्षिण गोव्यावरील आपला दावा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता याबाबतची औपचारिक घोषणा लवकरच होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. पंजाबमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. पंजाबमध्ये आपची सत्ता असून काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. अशा स्थितीत स्वतंत्र निवडणूक लढवणे योग्य ठरेल, अशी चर्चा आहे.

Advertisement
Tags :

.