For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्यातही आप-काँग्रेस आघाडी

06:07 AM Feb 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोव्यातही आप काँग्रेस आघाडी
Advertisement

अमितद्वयींचा पत्रकार परिषदेत दावा, दोन्ही जागा काँग्रेसच्या पदरात,

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

‘इंडी’ युतीचा भाग म्हणून राष्ट्रीय पातळीवर झालेल्या निर्णयानुसार येत्या लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दोन्ही जागा काँग्रेसच्या पदरात पडल्या आहेत. त्यामुळे यापूर्वी आम आदमी पार्टीने दक्षिण गोव्यासाठी जाहीर केलेला उमेदवार मागे घेतला आहे, अशी माहिती आप अध्यक्ष अमित पालेकर आणि काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली. या युतीच्या माध्यमातून आता आपचा ‘झाडू’ ‘हाती’ घेऊन काँग्रेस भाजपचा सफाया करणार आहे, असा दावा त्या दोघांनी केला.

Advertisement

शनिवारी पणजीत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपने यापूर्वी दक्षिण गोव्यातून आमदार व्हेन्झी व्हिएगश यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याचे पालेकर यांनी जाहीर केले.  युतीच्या हितासाठी आपने माघार घेण्याचा आणि भाजपचा मुकाबला करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.

सध्या आप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. भाजपचा पराभव करणे हे एकमेव ध्येय या युतीचे आहे. त्यामुळे राज्यातील ज्या अन्य विरोधी पक्षांना भाजपचा पराभव झालेला हवा आहे, अशा सर्व समविचारी पक्षांनाही आमच्या सोबत यावे.

एवढेच नव्हे तर 2022 च्या निवडणुकीत ज्या आमदारांनी भाजपच्या विरोधात मते मागितली होती, त्या अपक्षांनीही इंडी आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असे आवाहन दोन्ही नेत्यांनी केले.

आम्ही आरजीलाही सोबत येण्याचे आवाहन करतो, परंतु त्यांचे क्षणात बदलणारे निर्णय आणि तळ्यात-मळ्यात धोरणामुळे त्यांच्यावर किती विश्वास ठेवावा हाही प्रश्न असल्याचे पालेकर यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले. आरजीचा बोलविता धनी भलताच कुणीतरी असावा, त्यामुळेच ते स्थिर असा कोणताही निर्णय घेऊ शकत नसावे, असा संशयही पालेकर यांनी व्यक्त केला.

तरीही आरजीचे आम्ही स्वागतच करू. भाजपचा पराभव व्हावा असे त्यांना खरोखरच वाटत असेल तर त्यांनी अजूनही इंडी युतीसोबत यावे, असे पाटकर यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.