गोवा, हरियाणा, गुजरातमध्ये आप-काँग्रेस आघाडी
गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा काँग्रेसच्या खात्यात : दोन्ही पक्षात मतदारसंघ निश्चित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम आदमी पार्टी (आप) आणि काँग्रेसने लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा केली आहे. काँग्रेस आणि आपने पाच राज्यांमध्ये युतीची घोषणा केली आहे. 24 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये दोन्ही पक्षांनी पत्रकार परिषद घेतली. कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाकडून किती जागा लढवणार याबाबतही दोन्ही पक्षांमध्ये करार झाला आहे. त्यानुसार गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा काँग्रेसकडे गेल्या आहेत. मात्र, संपूर्ण पंजाबमध्ये एकत्र निवडणूक लढविण्याबाबत चर्चा झालेली नाही.
दिल्लीतील सात जागांपैकी काँग्रेस 3 तर आप 4 जागांवर लढणार आहे. गुजरातमधील 26 जागांपैकी काँग्रेस 24 आणि आप 2 (भरूच आणि भावनगरमध्ये) ठिकाणी लढणार आहेत. हरियाणातील 10 पैकी काँग्रेस 9 आणि आप 1 (कुऊक्षेत्र) जागा लढवेल. काँग्रेस चंदीगडमध्ये एकाच जागेवर निवडणूक लढवणार आहे. तर, गोव्यातील दोन्ही जागांवर काँग्रेस निवडणूक लढवणार असल्याची माहिती सद्यस्थितीत देण्यात आली.
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पाच राज्यांसाठी आघाडीची घोषणा करण्यात आली. या पत्रकार परिषदेत ‘आप’कडून संदीप पाठक, आतिशी आणि सौरभ भारद्वाज सहभागी झाले होते. तर, काँग्रेसकडून मुकुल वासनिक, दीपक बावरिया आणि अरविंदर लवली हे नेते उपस्थित होते.
आम आदमी पक्षासोबत गेल्या काही दिवसात दीर्घ चर्चा झाली असून काँग्रेस आणि आपमध्ये जागांबाबत करार झाला आहे. आप दिल्लीत लोकसभेच्या 4 जागांवर निवडणूक लढवणार आहे. त्यानुसार नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पूर्व दिल्लीत आम आदमी पार्टी तर उर्वरित तीन मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यात आले आहेत, अशी माहिती काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांनी दिली. गुजरातमधील भरूच आणि भावनगर या दोन लोकसभा जागांवर आप निवडणूक लढवणार आहे. तर चंदीगड लोकसभा जागेवर काँग्रेस आणि गोव्यातील दोन्ही जागांवर काँग्रेस लढणार आहे.