गोव्यात आप सत्तेत आल्यास पंजाबसारखा आरोग्यविमा लागू करणार
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची घोषणा
पणजी : पंजाबमध्ये आपच्या सरकारने मुख्यमंत्री सेहत योजना लागू करुन विक्रम केला आहे. त्याद्वारे प्रत्येक नागरिकाला 10 लाखांचा आरोग्य विमा दिला जात आहे. भाजपनेही अशाप्रकारची योजना गोव्यात लागू करावी. आम्हाला जर गोव्यात सत्ता मिळाली तर ती योजना आम्ही गोव्यात तात्काळ लागू करणार आहे, अशी घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली. काल गुऊवारी गोवा भेटीवर आलेले असताना मान यांनी दुपारी पत्रकार परिषदेला संबोधित केले. दोनापावला येथील गोवा इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित या पत्रकार परिषदेला त्यांच्यासमवेत गोवा प्रभारी आतिशी, प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, कार्याध्यक्ष गर्सन गोम्स, आमदार क्रूझ सिल्वा, प्रशांत नाईक, उपाध्यक्ष संदेश देसाई आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
पंजाबमध्ये आम्ही सत्ता हाती घेतली तेव्हा राज्याची आर्थिक स्थिती अक्षरश: बिकट होती. शिक्षण, कृषी, आरोग्य, अशा प्रत्येक क्षेत्रात मागासलेपणा आला होता. परंतु आज पंजाबमध्ये परिवर्तन आलेले आहे. प्रशासनात प्रगती झाली आहे. आज पंजाब हे सर्वाधिक महसूल उत्पन्न करणारे देशातील तिसरे राज्य ठरले आहे. त्यातूनच प्रभावित होऊन आम्ही आता राज्यातील प्रत्येक नागरिकाला 10 लाख ऊपयांची आरोग्य विमा योजना लागू करण्यात आली आहे. जगातील एकाही देशात अशाप्रकारची आरोग्य योजना नाही. त्यामुळे आमच्या योजनेचे जगभरात कौतुक होत आहे, असे मुख्यमंत्री मान यांनी सांगितले. अशीच योजना गोव्यासारख्या राज्यातही लागू झाली पाहिजे. त्यासाठी डबल इंजिन सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. परंतु भाजप ते कधीच करणार नाही. अशावेळी गोव्यात सत्ता मिळाल्यास आप ते कऊन दाखवेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
पुढे बोलताना मान यांनी, पंजाबमध्ये आप सरकारने तब्बल तीन कोटी लोकांच्या आरोग्य उपचारांची काळजी घेतली आहे. अशावेळी जेमतेम 15 लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यातनागरिकांना 10 लाख ऊपयांचा आरोग्य विमा का मिळू शकत नाही? असा सवाल उपस्थित केला. तत्पूर्वी बोलताना आतिशी यांनी आप सरकारच्या राष्ट्रीय पातळीवरील विविध योजनांचा आढावा घेतला. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमध्ये शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात संपूर्ण परिवर्तन झाले आहे. भाजप देशभरात आयुष्मान भारत योजना लागू करण्यात अपयशी ठरला आहे. केंद्राने आयुष्मान भारतसाठी 8,000 कोटी ऊपये वाटप केले असताना, आप सरकारने एकट्या पंजाबच्या आरोग्यसेवेसाठी 1,500 कोटी ऊपये वाटप केले, अशी माहिती त्यांनी दिली.
वाल्मिकी नाईक यांनी बोलताना, आरोग्य सुविधांच्या बाबतीत पंजाब आणि गोवा यांची तुलनाच होऊ शकत नसल्याचा दावा केला. पंजाबमध्ये सरकारी पातळीवरील सुमारे 900 इस्पितळांमधून लोकांना आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत तर याउलट गोव्यात एकमेव असलेल्या गोमेकॉवर प्रचंड ताण पडत आहे. भरीस शेकडो डॉक्टरांची कमतरता आहे. परिणामी आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. कॅग अहवालात सुद्धा या सेवेवरून ताशेरे ओढण्यात आले असून गोवा सरकार नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यातसुद्धा अपयशी ठरल्याचा तो पुरावा, आहे, असे नाईक यांनी पुढे सांगितले. पंजाबमध्ये आप औषधे खरेदी करण्यात, ऊग्णालये बांधण्यात आणि सामान्य माणसाच्या गरजा पूर्ण करण्यात व्यस्त आहे, तर गोव्यात भाजप सरकार आमदार खरेदीत आणि मालमत्ता विकण्यात व्यस्त आहे, अशी टीकाही नाईक यांनी केली.
दाबोळी विमानतळावर उत्स्फूर्त स्वागत
दरम्यान, गोवा भेटीवर आलेले मुख्यमंत्री मान यांचे सकाळी प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, आतिशी, गर्सन गोम्स, संदेश देसाई, यांच्यासह अन्य नेते आणि पदाधिकारी यांनी दाबोळी विमानतळावर स्वागत केले.