For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यमुना प्रदूषणावरून आप-भाजपमध्ये वाक्युद्ध

06:27 AM Oct 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
यमुना प्रदूषणावरून आप भाजपमध्ये वाक्युद्ध
Advertisement

उत्तरप्रदेशातून अस्वच्छ पाणी सोडले जात असल्याचा ‘आप’चा आरोप : 1 हजार कोटीच्या निधीबद्दल भाजपची विचारणा

Advertisement

वृत्तसंस्था./ नवी दिल्ली

दिल्लीमध्ये रविवारी सलग तिसऱ्या दिवशी यमुना नदीत विषारी फेस दिसून आला आहे. आम आदमी पक्षाने याप्रकरणी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. भाजप उत्तरप्रदेशातून यमुना नदीत अस्वच्छ पाणी सोडत असल्याने दिल्लीत पाण्यात फेस निर्माण होत आहे. एकीकडे आम्ही दिल्लीत युद्धपातळीवर प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तर दुसरीकडे भाजप गलिच्छ राजकारण करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

Advertisement

याच्या प्रत्युत्तरादाखल पूर्व दिल्लीचे भाजप खासदार हर्ष मल्होत्रा यांनी आप सरकारने 1 हजार कोटी रुपये प्रदूषण कर म्हणून जमा केले होते याची आठवण करून देत आतिशी यांनी या निधीचे काय झाले याचे उत्तर द्यावे असे म्हटले आहे.

यमुनेचे पाणी दिल्लीत दाखल होते, तेव्हा त्याची ऑक्सिजन पातळी 9 राहते, तर दिल्लीतून पाणी बाहेर पडल्यावर याची ऑक्सिजन पातळी शून्य होते. दिल्लीत वेगवेगळ्या ड्रेनेज पॉइंटवर असलेले ड्रेनेज प्रकल्प काम करत नसल्याचा दावा भाजप खासदाराने केला आहे.

भाजपचे तीन आरोप 

आप सरकारने यमुना नदीच्या सफाईवरून केवळ खोटा प्रचार केला आहे. उपराज्यपालांनी यमुनेच्या सफाईसाठी पावले उचलली असता आप सरकारने त्यांना रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 2025 पर्यंत यमुना नदी पूर्णपणे साफ करण्यात येईल असा दावा केजरीवालांनी केला होता. लोक यमुना नदीच्या पाण्यात छठ पूजेचा सण साजरा करतील, तेव्हा त्यांना कुठल्या आजारांना तोंड द्यावे लागणार अशी विचारणा भाजपने केला आहे. यमुनेच्या सफाईसाठी प्राप्त निधी जाहिरातींवर खर्च करण्यात आला आहे. यमुना नदीची सफाई आपसाठी केवळ राजकीय मुद्दा राहिला आहे, प्राथमिकता नाही. विषारी राजकारण दिल्लीतील विषारी हवा आणि पाण्यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

आपकडून प्रत्युत्तर

आप नेत्या रीना गुप्ता यांनी भाजपच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. जलप्रदूषण आणि वायू प्रदूषणाचे मुद्दे प्रशासकीय सीमा ओलांडणारे आहेत. हरियाणात काडीकचरा जाळण्याच्या घटनांमध्ये 30 टक्के तर उत्तरप्रदेशात 70 टक्क्यांची वाढ झाली आहे. पंजाबमध्ये काडीकचरा जाळण्याच्या घटनांमध्ये 30 टक्क्यांची घट झाल्याचा दावा आप नेत्याने केला आहे. दिल्लीच्या जवळपास 300 किलोमीटरच्या कक्षेत एक एअरशेड आहे. या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी मिळून काम करण्याची गरज असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा म्हटले आहे, परंतु केवळ दिल्ली आणि पंजाब सरकारच यात सक्रीयपणे काम करत असल्याचा दावा आप नेत्याने केला.

प्रदूषित पाण्यावरून अॅक्शन

यमुना नदीला आलेल्या फेसवरून दिल्ली जल बोर्डाने 18 ऑक्टोबर रोजी बैठक घेतली होती. यात छठ पूजेदरम्यान प्रदूषित पाणी राहू नये यावरून चर्चा करण्यात आली होती. यमुना यदीच्या पाण्यात अमोनिया आणि फॉस्फेटचे प्रमाण अत्यं अधिक आहे. यामुळे आरोग्याला गंभीर नुकसान पोहोचू शकते. छठ पूजा नजीक आल्याने विषारी फेसामुळे समस्या निर्माण होण्याची भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे.

Advertisement
Tags :

.