पंजाबमध्ये ‘आप’कडून 40 उमेदवारांची घोषणा
सर्व विद्यमान आमदारांना संधी : मुख्यमंत्री मान धुरीमधून लढणार
वृत्तसंस्था/ चंदीगड
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने पंजाबमधील आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 40 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे धुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून, अनेक कॅबिनेट मंत्र्यांचाही या पहिल्या यादीत समावेश आहे. तुरुंगवासी मंत्री संजीव अरोरा पुन्हा निवडणूक लढवणार असून, बहुतांश विद्यमान आमदारांना पहिल्या यादीत तिकीट देण्यात आले आहे. पंजाबमध्ये एकूण 117 विधानसभा जागा असून त्यापैकी ‘आप’ने निवडणुकीपूर्वी 40 जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नावाचाही आम आदमी पार्टीच्या पहिल्या यादीत समावेश आहे. ते संगरूर जिह्यातील धुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी 2022 मध्ये याच जागेवरून निवडणूक लढवली होती. भगवंत मान यांनी या जागेवरून काँग्रेसचे दलवीर सिंग गोल्डी यांचा पराभव केला होता. 2022 च्या निवडणुकीत भगवंत मान यांना 82,592 मते मिळाली, तर काँग्रेसचे दलबीर सिंग गोल्डी यांना 58,206 मते मिळाली. अशाप्रकारे, भगवंत मान यांनी ही जागा 24,386 मतांनी जिंकली. या निवडणुकीत मान यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला होता. ते यावेळीही त्याच जागेवरून निवडणूक लढवणार आहेत.
मंत्री संजीव अरोरा तुरुंगातून लढणार
पक्षाने 37 आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तुरुंगात असलेले मंत्री संजीव अरोरा हे देखील ‘आप’च्या पहिल्या यादीतून लुधियाना पश्चिम जागेवरून निवडणूक लढवणार आहेत. याव्यतिरिक्त आमदार कुलदीप सिंग धालीवाला अजनाला मतदारसंघातून, हरमीत सिंग संधू तरनतारनमधून आणि कुलवंत सिंग एमएएस नगरमधून निवडणूक लढवतील.
आम आदमी पार्टीने (आप) 2022 मध्ये पंजाबमध्ये मोठा विजय मिळवताना 117 पैकी 92 जागा जिंकल्या होत्या. पंजाबमध्ये बहुमतासाठी 59 जागांची आवश्यकता असते, जिथे ‘आप’ने मोठे मताधिक्य घेत विजय मिळवला. 2027 च्या पंजाब विधानसभा निवडणुका फेब्रुवारीपर्यंत होण्याची शक्यता आहे.
