‘आमचो दोतोर’ ॲप सुरू
सामान्यांना मुख्यमंत्र्यांशी थेट संपर्कात राहण्याची संधी
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संपर्कात राहण्यासाठी राज्य सरकारने ‘आमचो दोतोर’ हे नवीन ॲप विकसित केले आहे. त्याद्वारे जनतेला केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना, नोकरीविषयक संधी व इतर अत्यावश्यक माहिती ॲपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. ॲप मोबईलवर डाऊनलोड केल्यानंतर ती माहिती मिळणार आहे. लोकांशी संपर्कात राहण्यासाठी डॉ. सावंत हे नेहमीच प्रयत्नशील असतात. आता या ॲपमधून डॉ. सावंत यांच्याशी संपर्कात राहण्याची संधी लोकांना मिळणार आहे. सर्वच लोकांना येऊन डॉ. सावंत यांना प्रत्यक्षात भेटणे शक्य नाही. म्हणून हे ॲप सुरू केल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. सदर ॲपमधून लोकांना प्रश्न थेट डॉ. सावंत यांच्याकडे मांडण्याची संधी प्राप्त होणार आहे. तसेच राज्यातील विविध घडामोडींची महत्त्वाची माहितीदेखील मिळण्याची सोय ॲपवर करण्यात आली आहे. राज्यातील विविध गावातील शहरातील लोकांना घरी बसून ॲपमधून डॉ. सावंत यांच्याशी संपर्क साधता येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. काही महिन्यांपूर्वी लोकांचे प्रश्न त्वरित सोडविण्यासाठी सरकारतर्फे हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला होता आणि तो थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क घडवून आणत होता. त्यानंतर दूरदर्शनवर ‘हॅलो गोंयकार’ हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. हे दोन्हा उपक्रम चालू असून आता ‘ॲप’च्या माध्यमातून तिसरा उपक्रम चालू झाला आहे.