अनघा गावडे 'आमचा गणपती' स्पर्धेत प्रथम; पणजीत 'तरुण भारत' व 'फार्म एक्सप्रेस'तर्फे घरगुती गणेशमूर्ती व सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात
पणजी : घरगुती गणेशमूर्ती आणि सजावटीच्या माध्यमातून गोमंतकीयांच्या कलात्मकतेचे दर्शन घडते. या कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने 'तरुण भारत' व 'फार्म एक्सप्रेस' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 'आमचा गणपती' घरगुती आकर्षक गणेशमूर्ती व सजावट स्पर्धा 2026 च्या बक्षीस वितरण सोहळ्यात कुंकळये, फोंडा येथील अनघा हेमंत गावडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
तज्ज्ञ परीक्षकांनी केलेल्या मूल्यमापनातून स्पर्धेतील विजेत्यांची निवड करण्यात आली. निखिल अमडकर (डिचोली) यांनी द्वितीय, शुभम मयेकर (ताळगाव, चिंचोळे) यांनी तृतीय, संतोष केरकर (बोर्डा) यांनी चतुर्थ, तर शिवम गायक (विर्डी-सांखळी) यांनी पाचवा क्रमांक मिळवला. अक्षय नाईक (रिवण-सांग), हिरु शेटगांवकर (मोरजी-पेडणे), कैवल्या कमलेश बस्त (कुडचडे), नवीन सतरकर (कुर्टी-फोडा) आणि सिद्धांत दत्तू साखळकर (चिंचोळे-भाटले) यांना उत्तेजनार्थ पारितोषिके जाहीर करण्यात आली. विजेत्यांना रोख रक्कम, चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर फार्म एक्सप्रेसचे व्यवस्थापकीय संचालक रुपेश गांवस, दै. तरुण भारतचे समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर, दै. तरुण भारतच्या संचालिका सई ठाकुर बिजलानी, संपादक सागर जावडेकर व सरव्यवस्थापक सचिन पोवार उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक करताना सागर जावडेकर यांनी गोव्यात अनेक प्रतिभावान कलाकार असून, त्यांच्या कलागुणांचे कौतुक करण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या असल्याचे सांगितले, अशा उपक्रमांमुळे स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच गोव्याची कलात्मक परंपराही जपली जाते. गुणवत्ता, सर्जनशीलता आणि नावीन्य यांना प्राधान्य देणाऱ्या या स्पर्धेमुळे घरगुती गणेशोत्सव सजावटीला नवे व्यासपीठ मिळाले आहे. अशा उपक्रमांमुळे गोव्यातील कलाप्रेमी आणि हौशी कलाकारांना आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळत आहे.
रुपेश गांवस यांनी व्यक्त केली कृतज्ञतेची भावना
फार्म एक्सप्रेसचे व्यवस्थापकीय संचालक रुपेश गावस यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. लोकांच्या प्रेमामुळेच हा ब्रँड गोव्यात जन्माला आला आणि वाढला. आपण वयाच्या पाच-सहा वर्षांपासून 'तरुण भारत' वाचत आलो असून, आज व्यावसायिक म्हणून त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. गणेशोत्सवातील सजावट ही केवळ देखाव्यापुरती मर्यादित नसून, त्यातून प्रत्येकाच्या कल्पकतेचा, मेहनतीचा आणि कलादृष्टीचा प्रत्यय येतो.
स्पर्धांमुळे कलाकारांना प्रोत्साहन : सई ठाकुर
सई ठाकुर-बिजलानी यांनी गोमंतकीयांच्या गणेशमूर्ती सजावटीतील कल्पकतेचे कौतुक केले. अनेक सुंदर गणेशमूर्ती आणि आकर्षक सजावटी पाहायला मिळाल्याचे सांगत, अशा स्पर्धांमधून लोकांमधील कलात्मकता जागृत ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्पर्धांमुळे कलाकारांना आपली सर्जनशीलता दाखविण्यास आणि अधिक चांगले काम करण्यास प्रोत्साहन मिळते, असेही त्या म्हणाल्या.
गोवा कलाकारांची भूमी : किरण ठाकुर
गणेश ही बुद्धीची देवता असून, प्रत्येक शुभकार्याची सुरुवात तिच्या पूजनाने केली जाते. गोवा ही कलाकारांची भूमी असून, येथील कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी 'तरुण भारत' विविध उपक्रम राबवत आहे. अशा स्पर्धांमुळे घराघरांत जपली जाणारी कला आणि परंपरा व्यापक स्तरावर पोहोचण्यास मदत होते, असे डॉ. किरण ठाकुर यांनी सांगितले.
