नव्वद वर्षाच्या सेवानिवृत्तांना ‘गोकुळ’चा आधार; आर्थिक मदतीने भारावले सेवानिवृत्त कर्मचारी
अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या हस्ते दीड लाखांचा धनादेश सुपूर्द
कोल्हापूर प्रतिनिधी
नव्वदीतल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक आधार देत संघाच्या प्रतिकूल परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी गोकुळच्या रोपट्याचा वटवृक्ष करण्यासाठी दिलेल्या योगदानाबाबत गोकुळने कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या हस्ते संघाच्या गोकुळ शिरगाव येथील मुख्य प्रकल्पस्थळी धनादेशाचे वितरण करण्यात आले. संघाने केलेल्या आर्थिक मदतीने हे कर्मचारी भारावून गेले. तसेच 1963 पासून स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांना सहकार्य केलेल्या या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना गोकुळची ही मदत लाखमोलाची ठरेल, असे भावोद्गार अध्यक्ष डोंगळे यांनी काढले.
गोकुळच्या स्थापनेपासून संघात काम केलेले; पण सेवानिवृत्त झालेले जनार्दन देसाई, बाबूराव पाटील, मनोहर बेळगावकर, आत्माराम मगदूम, अमृतराव देसाई, बाळासो कातकर व विष्णू पाटील हे सात कर्मचारी हयात आहेत. त्यांना पेन्शन मिळत नाही, म्हणून गोकुळच्या अर्थसाहाय्यातून प्रत्येकी दीड लाख रुपयांचा धनादेश अध्यक्ष डोंगळे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना अध्यक्ष डोंगळे म्हणाले, गोकुळचा चौफेर विस्तारलेला वटवृक्ष आपण पाहतो परंतु या वटवृक्षाचे रोपटे स्व. आनंदराव पाटील (चुयेकर) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 1963 साली रोवले. ते वाढवण्यासाठी तत्कालीन संचालकापासून कर्मचाऱ्यांपर्यंत सारेच झपाटून कामाला लागले. त्याकाळी कर्मच्रायांना कोणत्याही सोयी सुविधा नसताना प्रतिकूल परिस्थितीत तुटपुंज्या पगारावर अविरत कष्ट घेतले. निवृत्ती वेतनाच्या कायद्याचा अभाव असतानाही ही मंडळी मागे हटली नाहीत. गोकुळ वाढला पाहिजे या भावनेतून संघाच्या प्रारंभीच्या कालावधीत त्यांनी बहमोल योगदान दिले म्हणूनच आज गोकुळचा इतका मोठा विस्तार झाल्याचे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, गोकुळ दूध संघाची 1963 मध्ये स्थापना झाली. गोकुळमध्ये 1973 मध्ये पेन्शन कायदा अंमलात आला. त्याप्रसंगी व्यवस्थापनाने 1963 ते 1973 या कालावधीतील संघाकडून व कर्मचाऱ्यांकडून भरावयाची वर्गणी जमा झाल्यास संबंधितांना निवृत्ती वेतनाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. दहा वर्षाचा पेन्शन फरक भरल्यास संबंधितांना पेन्शन कायद्यात समाविष्ठ करण्याचे धोरण होते. मात्र त्याकाळी कमी पगार आणि संघही तोट्यात असल्यामुळे सदरची वर्गणी कर्मचाऱ्यांनी व संघानेही भरलेली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत नाही. परिणामी संस्था स्थापन कालावधीतील कर्मचारी पेन्शन योजनेपासून वंचित राहिले. कालांतराने अनेक कर्मचारी निवृत्त झाले. संघ स्थापनेच्या प्रारंभीच्या काळात काम केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी हयात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अर्थिक मदत केल्याचे अध्यक्ष डोंगळे यांनी सांगितले.
प्रस्ताविक कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी केले. यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, अमरसिंह पाटील, सुजित मिणचेकर, बाळासो खाडे, चेतन नरके, मुरलीधर जाधव, अंजना रेडेकर आदी उपस्थित होते. सहा.महाव्यवस्थापक अनिल चौधरी यांनी आभार मानले.
‘गोकुळ‘मुळेच मानसन्मान
गोकुळमुळेच जीवनात यशस्वी झालो. मानसन्मान प्राप्त झाला. गोकुळचे अध्यक्ष डोंगळे आणि संचालक मंडळ यांनी आम्हा सर्वांच्या योगदानाची दखल घेऊन आमच्या थरथरत्या हातांना लाखमोलाचा आधार दिल्याबद्दल सेवानिवृत्त बोर्ड सेक्रेटरी जनार्दन देसाई यांनी आभार व्यक्त केले.