For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

6 कोटी मृत लोकांचे आधारकार्ड अद्याप सक्रिय

07:00 AM Nov 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
6 कोटी मृत लोकांचे आधारकार्ड अद्याप सक्रिय
Advertisement

पश्चिम बंगालमध्ये 34 लाख ओळखपत्रधारक आता जिवंत नाहीत : युआयडीएआयकडून सर्वेक्षण सुरू

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

देशात  प्रत्येक नागरिकाला आधार क्रमांक जारी करण्याच्या उपक्रमाला 15 वर्षे झाली आहेत. यादरम्यान 142 कोटीहून अधिक आधारकार्ड जारी झाली आहेत. तर 8 कोटीपेक्षा अधिक आधारकार्ड धारकांच्या मृत्यूनंतरही यातील केवळ 1.83 कोटी कार्डच निष्क्रीय होऊ शकली आहेत. सुमारे 6 कोटी मृत नागरिकांचे आधारकार्ड अद्याप सक्रीय आहे. पश्चिम बंगालमध्ये जवळपास 34 लाख आधारकार्ड धारकांचा मृत्यू झाला आहे, परंतु त्यांचे आधारकार्ड अद्याप सक्रीय आहे. यामुळे बँक फसवणूक, बनावट खाती आणि सरकारी योजनांमध्ये घोटाळा होण्याची शक्यता आहे.

Advertisement

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच युआयडीएआयचे सीईओ भुवनेश कुमार यांच्यानुसार रजिस्टर जनरल ऑफ इंडियाकडून आतापर्यंत युआयडीएआयला 1.55 कोटी मृत नागरिकांचा डाटा मिळाला आहे. नोव्हेंबर 2024 ते सप्टेंबर 2025 दरम्यान आणखी 38 लाख मृतांची सूची मिळाली आहे. यातील 1.17 कोटी मृत नागरिकांची ओळख पटली असून त्यांचे आधारकार्ड निष्क्रीय करण्यात आले आहे.

डिसेंबरपर्यंत 2 कोटी कार्ड निष्क्रीय होतील असा प्राधिकरणाचा अनुमान आहे. युआयडीएआयने चार महिन्यांपूर्वी वेबसाइटवर मृत्यू सूचना पोर्टल सुरू केले जेणेकरून कुटुंबातील मृत सदस्याचे आधार ऑनलाइन निष्क्रीय करण्याची सुविधा मिळू शकेल. आतापर्यंत केवळ 3 हजार लोकांनी ही माहिती नोंदविली असून यातील 500 प्रकरणांमध्येच पुष्टी होत त्यांचे कार्ड निष्क्रीय करण्यात आली.

शंभरी ओलांडलेले 8.3 लाख लोक

युआयडीएआयच्या डाटाबेसमध्ये 8.30 लाख आधारकार्डधारकांचे वय 100 वर्षांपेक्षा अधिक नोंद आहे. यातील सर्वाधिक 74 हजार महाराष्ट्रात, 67 हजार उत्तरप्रदेशात, तर आंधप्रदेशात 64 हजार आणि तेलंगणात 62 हजार कार्डधारक आहेत. राज्यांनी यातील आतापर्यंत 3086 प्रकरणांचीच पुष्टी दिली आहे. यातील 629 जिवंत, 783 मृत असून 1,674 प्रकरणांची माहिती मिळू शकलेली नाही.

48 लाख नोंदी नाही जुळल्या

सुमारे 48 लाख नावे डाटाशी जुळली नाहीत. यातील 4-5 टक्के नोंदी प्रादेशिक भाषेत नोंद असल्याने मॅच होऊ शकल्या नाहीत. या प्रक्रियेत 80 अशी प्रकरणे समोर आली, ज्यात मृत घोषित करण्यात आलेले लोक नंतर जिवंत आढळले. आता या प्रकरणांची चोकशी केली जातेय.

मृत्यूची नोंदणीला होतोय विलंब

आधारची सुरुवात 2010 मध्ये झाली, तर 2016 पासून सुमारे 8 कोटी आधारकार्ड धारकांचा मृत्यू झाल्याचा अनुमान आहे. नागरी नोंदणी व्यवस्थेद्वारे केवळ 25 राज्यांचे आकडे मिळत असतात. उर्वरित राज्यांकडून डाटा मिळविण्याचे काम जारी आहे. आधार जारी होण्यास सुरुवात झाली तेव्हा देशात दरवर्षी सुमारे 56 लाख मृत्यू व्हायचे. हा आकडा आता वाढून 85 लाखावर पोहोचला आहे. याचमुळे आम्ही 2016 पासून आतापर्यंत 8 कोटी मृत्यु झाल्याचे मानत आहोत. मृत्यूची नोंदणी अद्याप गांभीर्याने केली जात नसल्याचे उद्गार भुवनेश कुमार यांनी काढले आहेत.

Advertisement
Tags :

.