घराची कौले अंगावर पडून कारिवडेत तरुण गंभीर जखमी
ओटवणे प्रतिनिधी
घरालगतचे झाड घराच्या छप्परावर पडून वासे व मंगलोरी कौले अंगावर पडून तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना कारीवडे पेडवे नजीक पालववाडीत घडली. संजय वसंत साखुळकर (४८) असे या तरुणाचे नाव असून सध्या गोवा बांबोळी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या वादळी पावसादरम्यान ही घटना घडली. यावेळी तरुणाची आई वनिता साखुळकर घरात या झोपली होती परंतु सुदैवाने दैव बलवत्तर म्हणूनच तिचा या घटनेत जीव वाचला.या घटनेत गंभीर जखमी झालेल्या संजय साखुळकर यांना शेजाऱ्यांनी तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यानी प्रथमोपचार केले. मात्र मंगलोरी कौले डोक्यावर पडून खोलवर जखम झाल्यामुळे संजय साखुळकर यांना अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यानंतर अधिक उपचारासाठी शुक्रवारी दुपारी भाजपाचे आंबोली मंडळ उपाध्यक्ष अशोक माळकर व त्यांच्या सहकाऱ्यानी त्यांना गोवा बांबोळी रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी संजय साखुळकर यांच्या डोक्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या संजय साखुळकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.या घटनेचा प्रभारी तलाठी नमिता कुडतरकर, ग्रामसेवक भरत बुंदे आणि सरपंच आरती माळकर, पोलिस पाटील प्रदीप केळुसकर आदींनी घटनास्थळी जात पंचनामा केला. त्यानंतर संजय साखुळकर यांच्या घरावर कोसळलेले झाड विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी आपल्या कामगारा मार्फत तोडून ते दूर केले.