पेव्हर्सने स्वत:लाच जखमी करणाऱ्या युवकाला सिव्हिलमध्ये दाखल
पोलीस-नागरिकांचे धाडसी पाऊल
बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानकाजवळील वनखात्याच्या कार्यालयानजीक पेव्हर्सने स्वत:च्या डोक्यावर हल्ला करून घेणाऱ्या एका तरुणाच्या प्रतापामुळे केवळ नागरिकच नव्हे तर पोलिसांचेही धाबे दणाणले. बुधवारी दुपारी ही घटना घडली. एक तरुण वनखात्याच्या कार्यालयाजवळ पेव्हर्सने स्वत:च्या डोक्यावर हल्ला करून घेत होता. तो रक्तबंबाळ झाला होता. घाबरून कोणीच त्याला पकडण्यासाठी पुढे जात नव्हते. त्यावेळी दोघा पोलिसांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. तो कोणाचेच ऐकत नव्हता. शेवटी अंगावर पोती घालून त्याला पकडण्यात आले. ही घटना घडली त्यावेळी बघ्यांची गर्दी जमली होती. यासंबंधीचा व्हिडिओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. तो सुमारे 35 ते 40 वर्षांचा असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.