हेरॉईन विकणाऱ्या तरुणाला अटक
1 लाख 62 हजाराचे हेरॉईन जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
अशोकनगर येथे हेरॉईन विकणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. सीसीबीचे पोलीस निरीक्षक नंदीश्वर कुंभार व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी ही कारवाई केली असून त्याच्याजवळून 1 लाख 62 हजार रुपये किमतीचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.
यासंबंधी सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बागेश बलराम नंदाळकर (वय 25) रा. बसवाण गल्ली असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
गुरुवार दि. 28 नोव्हेंबर रोजी अशोकनगर येथील फुल मार्केटजवळ बागेश हेरॉईन विक्रीसाठी आला होता. पोलीस निरीक्षक नंदीश्वर कुंभार, हवालदार एस. बी. पाटील, ए. एन. रामगोंनट्टी, महेश पाटील आदींनी बागेशला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ 36 ग्रॅम 16 मिली हेरॉईन आढळून आले.
बेळगावात गांजा, पन्नीबरोबरच हेरॉईनचीही विक्री सुरू आहे. खासकरून शिक्षण संस्थांजवळ अमलीपदार्थांची विक्री जोरात सुरू आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी आपल्या अधिकाऱ्यांना अमलीपदार्थांचा व्यवसाय थोपविण्याची सूचना केली असून या पार्श्वभूमीवर कारवाई सुरू झाली आहे.