मासे पकडायला गेलेला युवक बुडाला
सातारा :
कण्हेर (ता. सातारा) च्या कालव्यात बुधवारी मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा तोल गेल्याने तो बुडाला. गुरूवारी सकाळी त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. सातारा तालुका पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाही केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत जाधव हा व त्याच्यासोबत एक लहान मुलगा कण्हेर कालव्यात मासे पकडण्यासाठी जाळे टाकत होते. यावेळी चंद्रकांत याचा तोल जाऊन तो कालव्यात पडला. हे पाहून सोबतचा मुलगा घाबरला. त्याने याची माहिती कुंटुंबातील सदस्यांना दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. परंतु चंद्रकांत हा बुडाला होता. या घटनेची माहिती तालुका पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनेची नोंद करून शोधकार्य सुरू केले. तोच गुरूवारी सकाळी त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. ग्रामस्थांनी यांची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी शिवेंद्रराजे रेस्क्यु टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. त्याच्यावर शवविच्छेदन करण्यात आले असून पुढील कार्यवाही पोलिसांनी केली आहे.