काँग्रेस रोडवर तरुणाचा बळी
प्रतिनिधी/ बेळगाव
भरधाव ट्रकने दुचाकीला ठोकरल्याने सोमनट्टी (ता. बैलहोंगल) येथील एक युवक जागीच ठार झाला. काँग्रेस रोडवर शनिवारी दुपारी ही घटना घडली असून वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. काँग्रेस रोडवर अपघातांची संख्याही वाढत चालली असून अवजड वाहनांना नागरिक बळी पडत आहेत. मुत्तय्या शंकरय्या यरगुद्दीमठ (वय 30) राहणार सोमनट्टी (ता. बैलहोंगल) असे अपघातात जागीच ठार झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. शनिवारी दुपारी केए 22 एचजी 4456 क्रमांकाच्या दुचाकीवरून जाताना ट्रकने ठोकरल्याने ट्रकच्या चाकाखाली सापडून तो जागीच ठार झाला.
यासंबंधी ट्रकचालकावर वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजन राजे अरस, एसीपी जोतिबा निकम, दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक बसगौडा पाटील आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पहिल्या रेल्वेगेटजवळ बॅरिकेड्स घातल्यामुळे या परिसरात अपघात वाढले आहेत. शनिवारी दुपारी 1 वाजता अपघातात बळी पडलेला मुत्तय्या हा होमनर्सिंगचे काम करीत होता. नानावाडी येथील सदाशिव उमराणी यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ नागरिकांची देखभाल करीत होता. काँग्रेस विहिरीकडून नानावाडीला दुचाकीवरून जाताना पहिल्या रेल्वेगेटकडून आलेल्या ट्रकची दुचाकीला धडक बसून हा अपघात झाला. या अपघातानंतर काँग्रेस रोडवर काहीकाळ वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाला होता. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. गर्दी हटवून पोलिसांनी मुत्तय्याचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविला. याच परिसरात दोन शाळकरी मुलींचाही अपघातात मृत्यू झाला होता. काँग्रेस विहिरीकडून मिलिटरी महादेव मंदिराकडे जाणारे वाहनचालक या परिसरात अपघातात बळी पडत आहेत.