रत्नागिरीत गांजा बाळगणाऱ्या तरुणाला अटक
रत्नागिरी :
शहरातील पांढरा समुद्र येथे गांजा हा अमली पदार्थ बाळगणाऱ्या संशयिताला शहर पोलिसांनी अटक केली. गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. रोहित राजेंद्र चव्हाण (रा. आंबेशेत रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी ७१६ ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केला. शुक्रवारी चव्हाण याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
शहरातील पांढरा समुद्र येथे अवैधरित्या गांजा या अमली पदार्थाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ५ जून रोजी रात्रीच्या सुमारास शहर पोलिसांचे पथक पांढरा समुद्र येथे गस्त घालत होते. यावेळी एक इसम संशयास्पद हालचाली करत असल्याचे पोलिसांना दिसले. त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्या ताब्यात ७१६ ग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ आढळला.
या प्रकरणी पोलिसांनी रोहित चव्हाणविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. ही कारवाई शहर पोलीस पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर, पोलीस उपनिरीक्षक श्याम आरमाळकर, सहाय्यक पोलीस फौजदार दीपक साळवी, हवालदार अरुण चाळके, अमोल भोसले, आशिष भालेकर, पंकज पडेलकर, अमित पालवे आदींनी केली.