आर्थिक व्यवहारातून सुळग्यातील तरुणाला बेदम मारहाण
उपचारासाठी नेताना रुग्णवाहिका अडवून पुन्हा हल्ला : काकती पोलिसात गुन्हा दाखल
बेळगाव : सुळगा-हिंडलगा येथील एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. जखमी अवस्थेत उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेतून बेळगावला येताना रेसकोर्सजवळ रुग्णवाहिका अडवून त्याला पुन्हा मारहाण करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. विजय परशराम चव्हाण (वय 33) रा. सुळगा-हिंडलगा असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. विजयने दिलेल्या फिर्यादीवरून सुनील आवडण व त्याच्या साथीदारांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
आर्थिक व्यवहारातून ही घटना घडल्याची माहिती जखमीने पोलीस अधिकाऱ्यांना दिली आहे. विजय चव्हाणने सुनीलकडून अडचणीला पैसे घेतले होते. घेतलेल्या रकमेच्या अनेकपटीने परतही करण्यात आले आहेत. तरीही वारंवार पैशांची मागणी करण्यात येत होती. बुधवार दि. 15 जानेवारी रोजी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास विजयला मारहाण करण्यात आली. जखमी विजयला सिव्हिलमध्ये दाखल करण्यासाठी 108 रुग्णवाहिका मागविण्यात आली. रुग्णवाहिकेतून सिव्हिलला येताना पाठलाग करून रेसकोर्सजवळ रुग्णवाहिका अडविण्यात आली व विजयला पुन्हा मारहाण करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे, उपनिरीक्षक मृत्युंजय मठद व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.