For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तरुणीच्या घरावर दगडफेक करणाऱ्या किणयेच्या तरुणाला अखेर अटक

11:11 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
तरुणीच्या घरावर दगडफेक करणाऱ्या किणयेच्या तरुणाला अखेर अटक
Advertisement

बेळगाव : प्रेमाला नकार देणाऱ्या तरुणीच्या घरावर दगडफेक करून तिला धमकावल्याच्या आरोपावरून बेळगाव ग्रामीण पोलिसांनी किणये, ता. बेळगाव येथील एका तरुणाला अटक केली आहे. चार दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. सुरुवातीला पोलिसांनी यासंबंधी एफआयआर दाखल करून घेण्यासही टाळाटाळ केली होती. तिप्पाण्णा सुभाष डुकरे (वय 25) रा. किणये असे त्याचे नाव आहे. दि. 21 मे रोजी सायंकाळी किणये येथील एक तरुणी घरी एकटीच असताना तिप्पाण्णाने तिच्या घरावर दगडफेक करून शिवीगाळ केली होती. दगडफेकीत खिडकीच्या काचा फुटल्या होत्या. यासंबंधी दुसऱ्या दिवशी 22 मे रोजी सायंकाळी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला होता. या घटनेनंतर तिप्पाण्णाने पलायन केले होते. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नचिकेत जनगौडा व त्यांच्या सहकाऱ्यांनी तिप्पाण्णाला अटक केली आहे. शुक्रवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. ज्यांच्या घरावर दगडफेक झाली, ती तरुणी सुरुवातीला फिर्याद देण्यासाठी गेली. त्यावेळी पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा आरोप आहे. शेवटी पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी कानउघाडणी करताच एफआयआर दाखल करून घेतला होता. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्तांनी बेळगाव ग्रामीण पोलिसांना त्वरित आरोपीला अटक करण्याची सूचना केली होती. तिप्पाण्णावर याच तरुणीने गेल्या वर्षीही बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली होती.

Advertisement

गाव सोडून जाण्याची वेळ

किणये येथील 21 वर्षीय तरुणी बेळगावात शिक्षण घेते. तिप्पाण्णाने तिचा पाठलाग करीत प्रेमासाठी तगादा लावला होता. तिने नकार देताच गेल्या वर्षीही त्याने त्रास देण्यास सुरू केली होती. त्याच्या त्रासाला कंटाळून तब्बल 8 महिने ही तरुणी व आई गाव सोडून नातेवाईकांच्या घरात रहात होते. तरीही बेळगाव ग्रामीण पोलिसांना याचे गांभीर्य वाटले नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानउघाडणीमुळे अखेर दगडफेक प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.