For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दापोलीच्या तरुणाने वाचवले विजापूरच्या चिमुरड्याचे प्राण

05:36 PM Feb 12, 2025 IST | Radhika Patil
दापोलीच्या तरुणाने वाचवले विजापूरच्या चिमुरड्याचे प्राण
Advertisement

दापोली / प्रतिक तुपे : 

Advertisement

जगात अतिदुर्मिळ अशा ‘ओएचएच प्लस’ रक्तगट असणाऱ्या कोकणातील दापोली तालुक्यातील आंजर्लेमधील ओमकार धनावडे या तरुणाच्या रक्तदानामुळे कर्नाटक राज्यातील एका चिमुरड्याचा जीव वाचवण्यात मोठा हातभार लागला आहे. या रक्तदानामुळे ओमकार धनावडे कौतुकास पात्र ठरला आहे. हा रक्तगट असणाऱ्यांची संख्या भारतात केवळ 180 तर जगात 540 आहे.

मुळातच ओमकार याला स्वत:चा रक्तगट हा जगातील अतिदुर्मीळ रक्तगट असल्याची माहिती नव्हती. तो आधी आपला रक्तगट ओ पॉझिटीव्ह आहे, असे समजत होता. परंतु आंजर्ले येथे झालेल्या रक्तदान शिबिराप्रसंगी त्याने रक्तदान केले. त्यावेळी रक्तसंकलनासाठी आलेल्या डॉक्टरांनी ओमकार धनावडे याला तुमचा रक्तगट खूप महत्वाचा व मौल्यवान तसेच अतिदुर्मीळ असून तुम्ही आम्हांला विचारल्याशिवाय रक्तदान करु नका, असे सांगितले. तेव्हापासून तो गरजेच्यावेळीच रक्तदानासाठी जात आहे. त्याने आतापर्यंत महाड, पुणे, सांगली अशा ठिकाणी 8 वेळा रक्तदान केले आहे.

Advertisement

कर्नाटक-विजापूरच्या बबलेश्वर येथील अवघ्या एक वर्षाच्या सिद्धांत प्रभूणे या चिमुकल्याची तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र त्यासाठी सिद्धांतचा ‘ओएचएच प्लस’ म्हणजेच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ असल्याचे समजले. तो रक्तगट जगात दुर्मीळ असल्याने कर्नाटकात या गटाचा एकही रक्तदाता नसल्याने चिंता व्यक्त करण्यात आली. सिद्धांतच्या पालकांना महाराष्ट्रातील बॉम्बे ब्लड डोनर ग्रुपची माहिती मिळाली. त्यानंतर संपर्क साधून ते सांगली येथे आले. तोपर्यंत डोनर ग्रुपचे अध्यक्ष विक्रम यादव यांनी रक्तदात्यांशी संपर्क करून तयारी केली होती. दापोली येथील ओमकारला त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्यात आला. त्यानंतर ओमकारने क्षणाचाही विलंब न करता सांगली गाठले. त्याच्यासोबत कोची येथील हनुमंत भोसलेही रक्तदानासाठी आले. सिद्धांतचे पालक तसेच ओमकार व भोसले तसेच येथील उपस्थित असणाऱ्यांना भाषेचा अडसर निर्माण झाला. कर्नाटकातील सिद्धांतच्या पालकांना मराठी कळत नव्हते तर ओमकार, भोसले, यादव व इतरांना कानडी भाषा येत नव्हती. अशावेळी सांगलीतील राहणाऱ्या सिकंदर जमादार यांची मदत घेण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांच्या मदतीने रक्तदान करून ओमकार धनावडे व भोसले यांची रक्त बॅग घेवून सिद्धांतचे नातलग कर्नाटक येथे रवाना झाले. जगातील दुर्मीळ रक्त वेळेत मिळाल्याने सिद्धांत या कर्नाटकातील बालकाची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. आपल्यामुळे एका परराज्यातील अर्थात कर्नाटकातील चिमुरड्याचा जीव वाचला, यात मोठे समाधान असल्याची भावना ओमकार धनावडेने ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना व्यक्त केली.

  • इतर देशांतील रुग्णांनाही झाली मदत

जगात ओएचएच प्लस अर्थात बॉम्बे ब्लड ग्रुप अत्यंत दुर्मीळ रक्तगट आहे. सुमारे एक लाखांमागे अवघ्या 10 जणांमध्ये हा रक्तगट आढळून येतो. बॉम्बे ब्लड ग्रुपचे अध्यक्ष यादव यांच्या ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशात सुमारे 750 रुग्णांना तर पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, बेल्जियम, मलेशिया, इंग्लंड, थायलंड, सिंगापूर, दुबईतील रुग्णांना मदत झाल्याचे समोर आले आहे.

  • जीवनदान देण्यासाठी उपयोगी पडल्याचे समाधान

माझा दुर्मीळ रक्तगट आहे. ओएचएच प्लस गटाच्या रक्ताची एका लहान बाळाला गरज असल्याचे मला समजले. त्याच्या जीवन-मरणाचा प्रश्न होता. मी तातडीने सांगली गाठली व रक्तदान केले. हा दुर्मीळ रक्तगट असल्याने जिल्ह्यातही शक्यतो कोणी नाही. सांगली येथे मी स्वत: व भोसले यांनी रक्तदान केले. एका बाळाला जीवनदान देण्यासाठी आपण उपयोगी पडलो, याचे समाधान वाटल्याचे दापोलीतील ओएचएच प्लस रक्तदाता ओमकार धनावडे यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.