मन व बुद्धी यांचे नियमन केल्याने योग्याच्या इच्छा, भय आणि क्रोध नाश पावलेले असतात
ईश्वरचिंतनात राहण्यात आपले भले आहे हे समजले की, साधकाला इतर इच्छा करण्यात स्वारस्य वाटत नाही. त्यामुळे तो निरिच्छ होतो. त्याच्या मनात फक्त आणि फक्त आत्मस्वरूपाचे विचार येत असतात. त्याच्या चित्तात केवळ त्यावर चिंतन चालू असते. बुद्धी केवळ साधनेत प्रगती साधण्यासाठी काय करायला हवे ते सुचवत असते आणि मी त्याप्रमाणे करीन हा अहंकारयुक्त विचार मनात न येता ईश्वर किंवा सद्गुरू माझ्याकडून योग्य ते करून घेतील अशी खात्री असते.
माउली पुढे म्हणतात, निर्विषय होऊन अंतर्मुख झालेला योगी इडा, पिंगळा व सुषुम्ना या तिन्ही नाड्यांचा भुवयांच्या टोकात जेथे मिलाफ होतो तेथे दृष्टिला स्थिर करून, मागे फिरवतात. त्यामुळे ते अंतर्मुख होतात. म्हणून संतांच्या डोळ्याच्या भावल्या उलट्या आहेत असे म्हणतात. वास्तविक पाहता त्या सरळ असतात आणि सामान्य माणसे बहिर्मुख असल्याने त्यांच्या डोळ्याच्या भावल्या आध्यात्मिक दृष्ट्या उलट्या आहेत असे म्हणायला हवे पण बहुसंख्य लोकांची दृष्टी बहिर्मुख असल्याने त्यांच्या डोळ्याच्या भावल्या सरळ आहेत आणि संतांच्या उलट्या आहेत असे म्हंटले जाते. उजव्या (पिंगळा) व डाव्या (इडा) नाकपुडीतून जात येत असलेल्या वायूची गती (रेचक व पूरक) बंद करून म्हणजे कुंभकावस्थेत प्राण व अपान यांची समगती म्हणजे ऐक्य करून त्यासह चित्तास ते व्योमगामी म्हणजे आकाशाकडे नेतात.
पुढील श्लोकात भगवंत सांगतात, मन व बुद्धी यांचे नियमन केल्याने योग्याच्या इच्छा, भय आणि क्रोध नाश पावलेला असतो. त्याचे मोक्ष मिळवणे हेच ध्येय असल्याने तो सर्वदा मुक्तच समजावा.
आवरी मुनि मोक्षार्थी इंद्रिये मन बुद्धि जो । सोडी इच्छा भय-क्रोध सर्वदा सुटला चि तो ।।28 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, ज्यावेळी प्राणापानांच्या निरोधाने मन शांत होते, त्यावेळी योग्याला नानाप्रकारच्या इच्छा होणे थांबते. जोपर्यंत माणसाच्या मनात निरनिराळे विचार येत असतात तोपर्यंत संसाराबद्दलच्या वेगवेगळ्या कल्पनांनी त्याच्या मनाच्या पडद्यावर संसाराचे चित्र उमटत असते. येथे माउली आपल्याला आपला संसार हा केवळ एखाद्या कागदावर काढलेल्या किंवा एखाद्या फळ्यावर रेखाटलेल्या चित्राप्रमाणे आहे हे लक्षात घ्यायला सांगत आहेत. कागदावरील किंवा फळ्यावरील चित्र हे तात्पुरते असते ते केव्हाही नष्ट केले जाऊ शकते. त्यामुळे ज्या गोष्टीचे अस्तित्व क्षणभर आहे तिला अवास्तव महत्त्व देऊ नये असे माऊली सांगत आहेत. पुढे माउली म्हणतात ज्या मनाच्या पडद्यावर हे चित्र उमटते ते मनच जर निर्विचार झाले तर तो मनोरूपी पडदा नष्ट झाल्याने त्यावर कोणतेही चित्र उमटण्याचा प्रश्नच येत नाही. पाण्यात प्रतिबिंब दिसते पण जर पाणीच आटले तर प्रतिबिंब कसे दिसणार? येथेही माउली क्षणभर दिसणाऱ्या प्रतिबिंबाप्रमाणे आपल्या संसाराची अवस्था आहे हे समजावून सांगत आहेत. अगदी पाणी आटण्याचीसुद्धा गरज नाही. वाऱ्याची एखादी झुळूक आली तरी ती पाण्याच्या शांत पृष्ठभागाला अस्थिर करते आणि प्रतिबिंब दिसायचे बंद होते. आपल्या चित्तातील अहंकार हा घटक महत्त्वाचा आहे.