For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्ञानी तापस कर्मिष्ठ ह्या सर्वांहून योगी वेगळा असतो

06:06 AM Jul 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
ज्ञानी तापस कर्मिष्ठ ह्या सर्वांहून  योगी वेगळा असतो
Advertisement

भगवंत म्हणाले, पूर्वी मी एकटाच होतो पण त्या एकटेपणाचा मला कंटाळा आला. त्यामुळे एकाचे अनेक होण्यासाठी विरंगुळा म्हणून मी विश्वाची निर्मिती करण्याचे ठरवले. त्यासाठी शिव आणि शक्ती ही माझीच दोन रूपे मी तयार केली. शिव म्हणजे चैतन्य आणि शक्ती म्हणजे माया. दोघे मिळून विश्वाची निर्मिती करतात. मायेला अष्टधा प्रकृती असेही म्हणतात ह्या अर्थाचा

Advertisement

पृथ्वी आप तसे तेज वायु आकाश पाचवे । मन बुद्धि अहंकार अशी प्रकृती अष्ट-धा ।। 4 ।। हा श्लोक आपण पहात आहोत त्यानुसार, माया निर्जीवाला सजीव करते. सर्व प्राणिमात्र या जीवमायेपासून निर्माण झाले आहेत असे जाण. सर्व जगाची निर्मिती आणि शेवट माझ्या इच्छेनुसार होतो. अंडज, स्वेदज, जरायुज, उद्भिज अशा चार प्रकारच्या आकृती आपोआप तयार होऊ लागतात. त्या चारही आकृती सारख्याच किंमतीच्या असतात परंतु त्यांचे आकार मात्र वेगवेगळे असतात.

ह्यावरून एक लक्षात येते की, ईश्वराने एक खेळ म्हणून विश्वाची निर्मिती केली. त्याच्या इच्छेनुसार अनेक प्रकारचे प्राणी तयार होत असले तरी निर्माण होणारी सर्व शरीरे ईश्वराच्या दृष्टीने सारख्याच योग्यतेची असतात. त्यामुळे अमुक एक कमी महत्त्वाचा, दुसरा जास्त महत्त्वाचा असा भेदाभेद ईश्वर करत नाही. ईश्वराला सर्व सारखेच असं संत मंडळी सांगत असतात आणि त्यांच्या वागणुकीतून ते दाखवूनही देतात. जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांच्या सुप्रसिद्ध अभंगात म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ? आइका जी तुम्ही भक्त भागवत। कराल ते हित सत्य करा? कोणाही जीवाचा न घडावा मत्सर। वर्म सर्वेश्वरपूजनाचे? तुका म्हणे एका देहाचे अवयव। सुखदु:ख जीव भोग पावे? ते म्हणतात, सर्व जग विष्णुमय असल्याने भेदाभेद करणे अमंगल आहे. शरीराचे सगळे अवयव सारखेच महत्त्वाचे असतात. आपण सर्व विष्णूच्या शरीराचे अवयव असल्याने सर्व सारखेच आहेत. म्हणून कुणाचा द्वेष, मत्सर करू नका. ह्या पद्धतीने वागणे हेच सर्वेश्वर पूजनाचे वर्म आहे. म्हणून देवाची भक्ती करणाऱ्याने समाजात सर्वांना समान वागवावे त्याला अभेदभक्ती असे नाव असून ती ईश्वराला अत्यंत प्रिय आहे.

Advertisement

भगवंत पुढे म्हणाले, अशाप्रकारे विश्वाची निर्मिती मायेकडून होते. कालांतराने माझ्या इच्छेनुसार तिने निर्माण केलेले जग ती नष्ट करून टाकते. ज्याप्रमाणे चित्रकार एखादे चित्र फळ्यावर काढतो आणि कालांतराने त्याला दुसरे चित्र काढावेसे वाटले की, तो पहिले चित्र पुसून टाकतो त्याप्रमाणे ईश्वर त्याच्या इच्छेनुसार जगाची निर्मिती करतो आणि त्याला कंटाळा आला की ते नष्ट करून टाकतो. मधल्या काळात माया प्राण्यांकडून कर्माकर्मांचे व्यवहार करून घेते. मायेची निर्मिती माझीच असल्याने ह्या जगाला आदि, मध्य व शेवट मीच आहे असे समज. पुढील श्लोकात भगवंत सांगतात, हे धनंजया, माझ्याहून वेगळे असे दुसरे काही नाही. ज्याप्रमाणे सोन्याच्या तारेमध्ये सोन्याचे मणी ओवावेत त्याप्रमाणे हे सर्व जग माझ्यामध्येच गुंफलेले आहे.

क्रमश:

Advertisement
Tags :

.