निरपेक्षतेनं कर्मे करून योगी चित्तशुद्धी साधतो
अध्याय चौथा
योगी स्वत:ला कर्ता मानत नाही. त्यामुळे जे कर्म वाट्याला येईल ते करताना त्याला कोणतीही अपेक्षा नसल्याने त्याचं मन त्यात गुंतलेलं नसतं. त्याने त्याचे मन आणि बुद्धी ईश्वराला अर्पण करून टाकलेली असल्याने कर्म करण्यासाठी आवश्यक त्या इंद्रियांच्या हालचाली ईश्वरच करून घेत आहे अशी खात्री त्याला असते. तसेच करत असलेल्या कर्माच्या यशापयशाची जबाबदारीही तो ईश्वरावर टाकत असल्याने तो त्यापासून अलिप्त असतो.
कर्म ईश्वरार्पण करण्याचा आणखी एक फायदा योग्याला होतो तो असा की, त्या कर्माच्या यशपयशातून होणाऱ्या सुखदु:खातून त्याची सुटका होते. जेव्हा मनुष्य काही अपेक्षेने कर्म करतो तेव्हा ती पूर्ण झाली तर मनुष्य सुखी होतो, नाही झाली तर तो दु:खी होतो. हे सुख किंवा दु:ख होणं यात मनुष्य गुंतून पडतो. त्याला आसक्ती म्हणता येईल पण निरपेक्षतेनं कर्म करणारा योगी कर्मफळात गुंतत नसल्याने कर्म करून होणाऱ्या सुखदु:खाबाबतही तो उदासीन असतो. योगी फक्त चित्तशुद्धी करता कर्मे करतो असं बाप्पा पुढील श्लोकात सांगतात,
कायिकं वाचिकं बौद्धमैन्द्रियं मानसं तथा ।
त्यक्त्वाशां कर्म कुर्वन्ति योगज्ञाश्चित्तशुद्धये ।।10।।
कायिक, वाचिक, बुद्धिविषयक, इंद्रियविषयक व मानसिक कर्मफलाची आशा सोडून योगज्ञानी चित्तशुद्धीकरिता कर्म करतात.
विवरण- योगी कोणत्याही प्रकारच्या कर्मफलाची अपेक्षा न ठेवता कर्म करत असल्याने त्या कर्माच्या पूर्ण होण्यानं वा न होण्यानं होणाऱ्या सुखदु:खाबाबत तो उदासीन असतो. निरपेक्षतेनं कर्म करण्यात योग्याला फक्त लोककल्याण साधायचे असते. शिवाजी महाराजांच्याकडे पैसा, जहागिरी हे सर्व काही होते त्यामुळे त्यानी मनात आणले असते तर त्या काळच्या राजामहाराजांप्रमाणे ऐशआरामात ते आयुष्य घालवू शकले असते. परंतु रयत सुलतानांच्या जुलमी राजवटीतून मुक्त होऊन सुखी व्हावी तिचे कल्याण व्हावे असे त्यांना फार वाटत होते. त्यांना पैसा, जहागिरी यातील काहीही नव्याने मिळवायचे नसताना, केवळ रयतेसाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला व प्रजेला सुखी केले म्हणून त्यांना श्रीमंत योगी असं रामदासस्वामी म्हणतात.
अशी लोककल्याणकारी कामं योगी करत असतात कारण त्यांना सर्वत्र समभाव वाटत असतो. हे सर्व विश्व त्यांना त्यांचं घर वाटत असतं आणि स्वत:च्या घरातले लोक सुखी व्हावेत म्हणून ते झटत असतात. म्हणूनच जो जे वांछील ते तो लाहो अशी भूमिका पसायदानात माऊली मांडतात. ही सर्व पूर्ण चित्तशुद्धी झाल्याची लक्षणं आहेत आणि योग्याचा निरपेक्षतेनं कर्म करण्यात पूर्ण चित्तशुद्धी व्हावी व परमेश्वराशी जवळीक साधली जावी हाच हेतू असतो. भगवंत गीतेत सांगतात ‘कर्मद्वाराची सिद्धीस पावले जनकादीक’ या सगळ्यातून योगी केवळ चित्तशुद्धी होण्यासाठी कर्म करतात हे लक्षात येते.
सत्य, क्षमा, दया, सरलत आणि संतोष हे सद्गुण अंगी मुरले की, मनुष्याचे चित्त शुद्ध होते. सद्गुण अंगी मुरणे म्हणजे काय? तर कितीही विपरीत परिस्थिती निर्माण झाली तरी या सद्गुणांबरहुकून वागायचं आहे असं ज्याचं चित्त शुद्ध आहे त्याला वेगळं लक्षात ठेवायला लागत नाही कारण त्याचा तो स्वभाव बनलेला असतो. त्याच्याशी कुणी कसंही वागलं तरी तो त्यानुसार न बदलता वरील सद्गुणांनी युक्त असंच वागतो. निरपेक्षतेनं जे कर्म करतात त्यांची चित्तशुद्धी होत असल्याने त्यांचा स्वभाव असा तयार होत असतो. निरनिराळ्या संतांच्या चरित्रातील प्रसंग अभ्यासले तर आपल्याला त्यांची वागणूक आश्चर्यचकित करते. चित्तशुद्धी झाल्यामुळे निरनिराळ्या परीक्षेच्या प्रसंगात ते आदर्शवत कसं वागू शकले याचं उत्तरही आपल्याला मिळतं.
क्रमश: