ए. वा. पाटील भाजपच्या वाटेवर...नागपूरात घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
पक्षात के.पी. पाटील आणि हसन मुश्रीफ य़ांच्याकडून आपले खच्चीकरण होत असल्याचा थेट आरोप केल्यानंतर बिद्री कारखान्याच्या निवडणूकीमध्ये झालेल्या पराभवानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील आता भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. ए. वाय. पाटील यांच्या भाजप प्रवेशासाठी जिल्ह्यातील भाजप नेत्यांकडून जोरदार हालचाली सुरु असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ए. वाय. पाटील आणि चंद्रकांत पाटील यांनी नागपूरला भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे.
गेले वर्षभर राष्ट्रवादीमध्ये घुसमट होत असून आपले खच्चीकरण करण्यात येत असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केला होता. बिद्री कारखान्याच्या निवडणूकीत परिवर्तन आघाडीच्या सोळांकूर येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना ए. वाय. पाटील यांनी पक्षाच्या जिल्हा नेर्तृत्वावर थेट आरोप करताना पक्षश्रेष्ठींकडे दाद मागूनही आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.
गेल्या काही महिन्यांपासून ए. वाय. पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा होती. पण बिद्रीच्या निकालानंतर राजकिय घडामोडींना जोरदार वेग आला असून जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचा भाजप प्रवेश लवकरच निश्चित होईल असे बोलले जात आहे. बिद्रीच्या निवडणूकीमध्ये परिवर्तन आघाडीमध्ये ए. वाय. पाटील यांचा समावेश करण्यासाठी भाजपचे नेते आमदार चंद्रकांत दादा पाटील यांचा मोठा हात होता. पण बिद्रीतील पराभवानंतर ए. वाय. यांचे पुनर्वसन आणि भाजपचा विस्तार करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी ए. वाय. पाटलांच्या
भाजपप्रवेशासाठी जोरदार हालचाली केल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्यासह ए. वाय. पाटील हे नागपूरला रवाना झाले असून चंद्रकांत पाटील यांच्यासह तिन्ही नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.