शरीरातून काढला महायुद्धातील बाँब
ही घटना फ्रान्समधील आहे. फ्रान्समधील एका युवकावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याला खूप दुखत होते म्हणून तो तपासणीसाठी रुग्णालयात आला. त्यावेळी त्याच्या शरीरात एक वस्तू घुसली असल्याचे तपासणीत निदर्शनास आले आणि डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया करताना त्याच्या पायात 20 सेंटीमीटर लांबीची वस्तू असल्याचे आढळले. ही वस्तू काढत असताना तो एक बाँब असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यामुळे शस्त्रक्रिया कक्षात एकच घबराट उडाली. डॉक्टरांचीही भीतीने गाळण उडाली. त्यांनी शस्त्रक्रिया थांबविण्याचा निर्णय घेतला आणि पोलिसांना तसेच बाँब निकामी करणाऱ्या पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी येऊन या वस्तूची तपासणी केली. तेव्हा तो प्रथम महायुद्धातला एक छोटा बाँब असल्याचे आढळून आले. हे महायुद्ध 1914 ते 1918 या काळातील आहे. या बाँबची निर्मिती 1918 मधील असल्याचेही दिसून आले. हा बाँब निष्क्रीय होता. त्यामुळे त्याचा स्फोट होण्याची शक्यता नव्हती.
नंतर बाँब् शरीरातून बाहेर काढण्यात आला. बाँबची पुन्हा कसून तपासणी करण्यात आली. तो बंदुकीच्या गोळीसारख्या आकाराचा होता. ब्रिटनमध्येही 2021 मध्ये अशी एक घटना घडली होती. आता प्रश्न असा निर्माण झाला आहे, की या युवकांच्या शरीरात हा बाँब घुसला कसा ? कारण हा युवक केवळ 24 वर्षे वयाचा आहे. त्यामुळे तो या महायुद्धाच्या नंतर जन्माला आला आहे, हे निश्चित आहे. मग त्याचा या बाँबशी संबंध आला कसा आणि कुठे याची चौकशी आता केली जात आहे. युरोपमध्ये आजही अनेक स्थानी प्रथम महायुद्ध आणि द्वितीय महायुद्धातले बाँब विखुरलेले आहेत. ते काहीवेळा फुटतात आणि त्यांच्या जवळपास त्यावेळी असणाऱ्या व्यक्तींचा मृत्यूही होतो. काही बाँब आता निष्क्रीय झाले आहेत. त्यामुळे त्यांचा स्फोट होत नाही. या बाँब्जच्या भीतीमुळे तेथे अनेक देशांमध्ये बरीचशी भूमी निर्मनुष्यच राहिली आहे. युरोप आणि आफ्रिका या दोन
खंडांमधल्या लोकांना आजही काही स्थानी या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे काही देशांनी हे बाँब आणि सुरुंग नष्ट करण्यासाठी कोट्यावधी डॉलर्स खर्च करुन प्रयत्न चालविले आहेत. तथापि, आजही ही समस्या भेडसावत आहे.