4 महिन्यांच्या कैवल्याच्या नावावर विश्वविक्रम
स्वत:च्या गुणवत्तेद्वारे लोकांना केले चकित
आंध्रप्रदेशच्या नंदीगाममधून एक अनोखी घटना समोर आली आहे. तेथील एका चार महिन्यांच्या मुलीने स्वत:च्या नावावर विश्वविक्रम केला आहे. चार महिन्यांच्या कैवल्याची बुद्धी पाहून जगभरातील लोक चकित झाले आहेत.
नंदीगाम येथे राहणारे दांपत्य रमेश आणि हेमा यांची चार महिन्यांची मुलगी कैवल्या केवळ पाहून 120 गोष्टींना ओळखू शकते. यात पक्षी, भाजी, फळे आणि अन्य प्रकारच्या अनेक वस्तू सामील आहेत. कैवल्याच्या आईने तिची ही गुणवत्ता ओळखून ती जगासमोर आणण्याचा निर्णय घेतला. यानंतर हेमा यांनी कैवल्याचा एक व्हिडिओ तयार केला आणि तो नोबेल वर्ल्ड रेकॉर्ड्सला पाठविला.
नोबेल वर्ल्ड रेकॉर्ड्सने कैवल्याच्या कौशल्याची पडताळणी केली आणि मग तिचे नाव वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नेंदविले. नोबेल वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून कैवल्याला प्रमाणपत्र देण्यात आले आहे. कैवल्याने 3 फेब्रुवारी रोजी हा विक्रम नोंदविला आहे. कैवल्याला ‘100 प्लस फ्लॅशकार्ड ओळखणारे जगातील पहिले चार महिन्यांचे मूल’ ठरविण्यात आले आहे.
सोशल मीडियावर कैवल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ती वस्तूंना ओळखताना दिसून येते. या 120 फ्लॅक्स कार्डमध्ये 12 फुले, 27 भाज्या, 27 फळे, 27 प्राणी आणि 27 पक्षी सामील होते. तसेच एक छायाचित्रही शेअर करण्यात आले असून यात कैवल्याच्या गळ्यात पदक असून तिच्यानजीक जागतिक विक्रमाचे पदक ठेवलेले दिसून येते.
कैवल्याच्या नावावर विक्रम नोंदविला गेल्याने तिचे आईवडिल अत्यंत आनंदी आहेत. अन्य आईवडिलांनी देखील स्वत:च्या मुलांच्या कौशल्याला ओळखून त्यांना वाव द्यावा असे त्यांनी म्हटले आहे.