एक अद्भूत गाव
उत्तर प्रदेशातील बाघपत जिल्ह्यात बामनौली नामक एक गाव आहे. एक अद्भूत गाव अशी त्याची ख्याती असंख्य वर्षांपासून आहे. हे हवेल्यांचे गाव म्हणूनही प्रसिद्ध असून येथील लोकांची ओळख या हवेल्यांच्या माध्यमातूनच होत असते. या गावात येणाऱ्या लोकांना जर कोणाच्या घरी जायचे असेल तर त्यांना त्या घराचे, अर्थात त्या हवेलीचे नाव सांगावे लागते. या गावात 11 प्राचीन मंदिरेही आहेत. या गावाचे आणखी एक वैशिष्ट्या असे की, येथील लोक आपल्या नावांच्या पुढे किंवा मागे विविध पशुपक्ष्यांची नावे पुरातन काळापासून लावतात.
या गावाचा इतिहासही मोठा स्वारस्यपूर्ण आहे. 250 वर्षांपूर्वी या गावात मोठ्या हवेल्या बांधण्याच्या कामाचा प्रारंभ झाला. काही वर्षांमध्येच 50 हून अधिक हवेल्या बांधण्यात आल्या. त्यामुळे या गावाला हवेल्यांचे गाव अशी ओळख मिळाली. आजही या गावात हवेल्यांची संख्या जास्त असून 25 हून अधिक हवेल्यांमध्ये त्यांच्या मालकांच्या पूर्वजांच्या स्मृती जतन केल्या गेल्या आहेत.
हवेल्यांप्रमाणेच या गावात 11 पुरातन मंदिरे आहेत. ही मंदिरे गावाच्या चारी बाजूंना बांधण्यात आली आहेत. नागेश्वर मंदीर, बाबा सुजनदास मंदीर, शिव मंदीर, हनुमान मंदीर, बाबा काली सिंह मंदीर, दिगंबर जैन मंदीर, शिव मंदीर, गुरु रविदास मंदीर इत्यादी मंदिरे देशभर प्रसिद्ध आहेत. येथील लोक आपल्या नावाच्या आधी किंवा नंतर कोणत्या तरी प्राण्याचे किंवा पक्ष्याचे नाव लावतात. वीरेश भेडिया या ग्रामस्थाने अशा अनेक नावांची माहिती दिली. तोता, चिडीया, गिलहरी, बकरी, बंदर आदी नावांनी येथील माणसे ओळखली जातात. येथे पोस्ट कार्यलय असून गावातल्या लोकांना बाहेरुन पत्रे येतात. त्या पत्रांवरही हे उपनाम लिहिलेले असते. या प्राणी किंवा पक्ष्याच्या उपनामावरुनच हे पत्र विशिष्ट व्यक्तीच्या घरात पोहचविले जाते. असे हे गाव संपूर्ण उत्तर प्रदेशात बरेच प्रसिद्ध आहे.