For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Hasane Waterfall | राधानगरीत निसर्गाचा अद्भुत नजारा! हसणे धबधबा दिमाखात कोसळतोय

12:15 PM Jul 05, 2026 IST | NEETA POTDAR
hasane waterfall    राधानगरीत निसर्गाचा अद्भुत नजारा  हसणे धबधबा दिमाखात कोसळतोय
Advertisement

राधानगरी - राधानगरी तालुक्यातील अभयारण्य परिसरात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे निसर्गाचे मनोहारी रूप खुलून आले असून, हसणे ता, राधानगरी या गावाजवळील प्रसिद्ध हसणे धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. धुक्याची दुलई, घनदाट जंगल, डोंगररांगा आणि फेसाळ पांढऱ्या पाण्याच्या धारा यामुळे हा धबधबा सध्या पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण ठरत आहे.

Advertisement

Advertisement

राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील लघु पाटबंधारे प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहेत. त्यातून निर्माण झालेला हसणे धबधबा सुमारे शेकडो फूट उंचीवरून कोसळत असल्याने त्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी दररोज पर्यटक मोठ्या संख्येने येथे दाखल होत आहेत. धबधब्याच्या गर्जनेसह उडणारे तुषार, हिरवाईने नटलेले जंगल आणि दाट धुके यामुळे परिसराला स्वर्गीय स्वरूप प्राप्त झाले आहे.

राधानगरीपासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर निपाणी–देवगड राज्य महामार्गालगत हसणे गाव असून, गावापासून अवघ्या चार किलोमीटरवर हा धबधबा आहे. त्यामुळे कोल्हापूर, गडहिंग्लज, आजरा, भुदरगड तसेच सिंधुदुर्ग आणि कोकणातील अनेक पर्यटक मोटारसायकल व चारचाकी वाहनांनी येथे येत आहेत. सप्ताहाच्या सुट्टीच्या दिवशी येथे विशेष गर्दी होत असल्याचे चित्र आहे.

हसणे धबधब्याच्या परिसरात जैवविविधतेने समृद्ध असे सदाहरित जंगल, विविध प्रकारचे पक्षी, औषधी वनस्पती आणि बॅकवॉटरचे नयनरम्य दृश्य पर्यटकांना भुरळ घालत आहे. त्यामुळे छायाचित्रकार, ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठीही हे ठिकाण विशेष पसंतीचे बनले आहे.दरम्यान, धबधब्याच्या परिसरात पावसामुळे दगड निसरडे झाले असून पाण्याचा वेगही वाढलेला आहे. त्यामुळे पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, सेल्फीच्या मोहापायी जीव धोक्यात घालू नये, प्रशासनाने लावलेल्या सूचना व सुरक्षा नियमांचे पालन करावे, तसेच प्लास्टिक व इतर कचरा न टाकता परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन पोलीस प्रशासन व वन विभागाकडून करण्यात येत आहे.पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हसणे धबधबा पुन्हा एकदा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला असून, आगामी काळात पावसाचा जोर कायम राहिल्यास या परिसरात पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Tags :

.