एक अद्भूत संग्रहालय
फ्रान्स या देशात एक अद्भूत संग्रहालय आहे. साधारणत: संग्रहालय म्हटले की आपल्या डोळ्यासमोर जुन्या काळातील शस्त्रे, तलवारी, कट्यारी, अंगरखे, इतिहासप्रसिद्ध व्यक्तींची वस्त्रप्रावरणे, जुनी भांडी किंवा त्यांचे तुकडे, जुन्या मूर्ती किंवा त्यांचे अवषेश, पुरातन नाणी, पुरातन कागदपत्रे इत्यादी दृष्ये तरळू लागतात. तथापि, हे संग्रहालय अशा प्रकारचे नाही. त्याचे स्वरुप अगदी भिन्न आहे.
या संग्रहालयात जुन्या काळातील युरोपातील अनेक शहरे, त्यांच्यामधील दुर्ग किंवा किल्ले, महत्वाची स्थाने इत्यादींची मॉडेल्स ठेवलेली आहेत. अशी मॉडेल्स असणारी संग्रहालयेही आजच्या जगात नवी नाहीत. तथापि या संग्रहालयामध्ये ज्या उद्देशाने ही मॉडेल्स ठेवण्यात आली आहेत, तो उद्देश आश्चर्यकारक होता. अशी मॉडेल्स निर्माण करुन त्यांच्यावर कसे आणि कोठून हल्ले केले पाहिजेत, याचा अभ्यास फ्रान्समधील सैन्याधिकारी आणि सैनिक करीत होते. हे युद्धतंत्र त्या काळात अत्यंत आधुनिक मानले जात होते. अचूक आणि कमी साधनसामग्रीत यशस्वी हल्ले करणे अशा मॉडेल्समुळे तेव्हा शक्य होत असे.
आज या संग्रहालयाचा उपयोग जुन्या युरोपच्या अभ्यासासाठी केला जातो. तसेच जुन्या काळातील युद्धतंत्र, जुना युरोप आणि नवा युरोप यांच्यातील भिन्नत्व, भविष्याचा वेळ घेणे इत्यादी कामांसाठीही याचा उपयोग केला जातो. ही मॉडेल्स किमान 300 ते 400 वर्षांपूर्वीची असावीत असे मानले जाते. त्यावेळी नकाशे निर्माण करण्याचे शास्त्रही फारसे प्रगत झाले नव्हते. अशा काळात अनेक शहरांची अचूक मॉडेल्स कशी निर्माण केली जात होती, यासंबंधी आश्चर्य व्यक्त केले जाते.