वृक्षाच्या मदतीने महिलेचा विश्वविक्रम
वृक्षाने केली आहे माझी निवड
एका महिलेने वृक्षाच्या मदतीने विश्वविक्रम नोंदविला आहे. ही महिला पर्यावरण कार्यकर्ती असून ती युगांडाच्या कंपाला येथे राहते. तिने सर्वाधिक वेळेपर्यंत वृक्षाला आलिंगन देण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. 29 वर्षीय फेथ पेट्रीसिया एरियोकोटने विक्रम नोंदविण्यासाठी 16 तास 6 सेकंदांपर्यंत वृक्षाला स्वत:च्या मिठीत घेतले होते. तिने लोकांना वृक्षारोपणासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांचे रक्षण करण्याच्या आवश्यकतेवर प्रकाश टाकला आहे.
हवामान बदलाच्या विरोधात हे वृक्ष म्हणजे महान सैनिक आहेत. या विक्रमासाठी वृक्षाची निवड करणे म्हणजे विवाहासाठी ड्रेस निवडण्यासारखे होते. या वृक्षाने माझी निवड केली आणि हे पहिल्या नजरेत प्रेमात पडण्याप्रमाणे होते. हा विक्रम सर्वात लांब मॅराथॉन विक्रमापेक्षा काहीसा वेगळा आहे. सर्वाधिक काळापर्यंत स्वयंपाक करण्याचा विक्रम करणाऱ्यांना आरामासाठी प्रत्येक तासानंतर 5 मिनिटांचा वेळ दिला जात असतो, असे तिचे सांगणे आहे.
विश्वविक्रम करण्यासाठी फेथला पूर्णवेळ वृक्षाला स्वत:च्या मिठीत ठेवायचे होते. ती काही क्षणांसाठी देखील वृक्षाला सोडू शकत नव्हती. तिला पूर्णवेळ उभे रहायचे होते. 16 तासांपर्यंत उभे राहिल्याने माझ्या पायांमध्ये वेदना होत होती, वृक्षाचे खोडही टोचत होते, परंतु मला वृक्षाला दिलेले आलिंगन कायम ठेवायचे होते असे फेथने सांगितले आहे.
फेथचा हा तिसरा प्रयत्न होता. यापूर्वी तिने वृक्षाला आलिंगन देण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. एकदा ही कामगिरी कॅमेऱ्यात योग्यप्रकारे कैद झाली नव्हती. तर दुसऱ्या प्रयत्नात वादळामुळे हा प्रकार अर्ध्यावरच सोडून द्यावा लागला होता. परंतु यावेळी 9 तासांनंतर फेथचे धैर्य कोलमडू लागले होते. तरीही तिने प्रयत्नांवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. माझ्या या कामगिरीनंतर लोक पर्यावरणासंबंधी अधिक जागरुक होतील, वृक्षारोपणासाठी प्रेरित होतील असे फेथचे सांगणे आहे.