७३८ दिवसांपर्यंत झाडावर राहिलेली महिला
वृक्ष तोडण्यापासून वाचविण्यासाठी कुणी आंदोलन केल्याचे तुम्ही ऐकले असेल. भारतातील चिपको आंदोलन देखील जगभरासाठी उदाहरण ठरले होते. परंतु एखादा व्यक्ती झाडाला कितीवेळ चिकटून राहू शकेल? एका महिलेने वृक्षाला तोडण्यापासून वाचविण्यासाठी त्यावरच ठाण मांडली होती. तिने या झाडावर काही दिवस नव्हे तर तब्बल दोन वर्षे काढली होती. जुलिया बटरफ्लाय हिल या महिलेने सुमारे 26 वर्षांपूर्वी 200 फूट लांब झाडाला वाचविण्यासाठी त्यावरच राहण्यास सुरुवात केली होती आणि झाडावर ती 738 दिवस राहिली होती. जुलियाने कुठलेही नियोजन किंवा प्रसिद्ध होण्याच्या स्टंट अंतर्गत हे केले नव्हते. जुलिया बटरफ्लाय एक पर्यावरण कार्यकर्ती आहे. पर्यावरणासाठी काही तरी करण्याची संधी तिला डिसेंबर 1997 मध्ये मिळाली. त्यावेळी 23 वर्षीय जुलिया कॅलिफोर्नियात रस्तेप्रवास करत होती. तेव्हा तिची भेट हम्बोल्ट काउंटीच्या आकर्षक रेडवुडदरम्यान ‘ट्री सिट्स’च्या माध्यमातून फिरणाऱ्या पर्यावरण योद्ध्यांच्या एका समुहाशी झाली.
एका दुर्घटनेने दिली प्रेरणा
वयाच्या 20 व्या वर्षी एका गंभीर कार दुर्घटनेनंतर जुलियाला स्वत:चे जीवन असंतुलित झाल्याची जाणीव झाली होती. या दुर्घटनेने मला काळाच्या महत्त्वाविषयी सांगितले आणि भविष्यावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी मी जे काही करू शकते, त्यासाठी प्रेरित केल्याचे जुलियाने सांगितले आहे.
झाडासाठी स्वत:ला झोकून दिले
1997 मध्ये प्राचीन वृक्षांची तोड मोठी समस्या ठरली होती. कारण अमेरिकेत केवळ 3 टक्के प्राचीन रेडवुड वृक्ष शिल्लक राहिले होते. एका वृक्षाला पॅसिफिक लम्बर कंपनीकडून कापले जाणार होते. हा वृक्ष 1000 वर्षे जुना होता. यावर वीज कोसळूनही तो जिवंत राहिला होता. कार्यकर्त्यांनी याचे नाव चंद्राच्या नावावर लूना ठेवले होते. वृक्षाची तोड करण्यास या कार्यकर्त्यांचा विरोध होता. एखाद्या व्यक्तीने एक आठवड्यापर्यंत झाडावर ठाण मांडावे, अशी त्यांची योजना होती. परंतु कुणीच स्वेच्छेने पुढे येत नव्हता, याचमुळे माझी निवड झाली. मी त्यावेळी अधिकृतपणे कुठल्याही पर्यावरण संघटनेशी जोडलेली नव्हती, असे जुलियाने सांगितले आहे.
लाकडाच्या प्लॅटफॉर्मचा आधार
प्रारंभी जुलियाला 6 बाय चार फुटांच्या लाकडाच्या प्लॅटफॉर्मवर राहण्याची संधी देण्यात आली. लूनावर राहताना तिला एक सौरऊर्जेने चालणारा फोन देण्यात आला होता, जेणेकरून ती प्रसारमाध्यमांशी संवाद साधू शकेल. तिला भोजन आणि अन्य सामग्री पुरविण्यासाठी स्वयंसेवक नियमित स्वरुपात तीन मैलाचे अंतर कापत होते.
प्रकरण लांबत गेले
जुलियाला हेलिकॉप्टर्सद्वारे त्रास देण्यात आला. वृक्षतोड करणाऱ्या कामगारांनी तिला धमकाविले आणि तिला सर्वप्रकारच्या ऋतूंमध्ये झाडावरच रहावे लागले. तिला लवकरच अन्य संघटनांसोबत ‘अर्थ फर्स्ट’ आणि स्वयंसेवकांकडून सक्रीय समर्थन मिळू लागले आणि ज्युलियाचा विरोध करत राहण्याचा निर्धार आणि प्रवास लांबत गेला.
अडचणींनी भरलेला काळ
हा सर्व प्रकार जुलियासाठी सोपा नव्हता. सर्वात खराब अल नीनो वादळ ठरले होते. जे पॅलिफोर्नियात दाखल झाले होते. या वादळामुळे सोसाट वारा आणि भरपूर पाऊस पडल्याने जुलियाला अनेक दिवसांपर्यंत थंडीत काढावे लागले. कधीकधी असुविधा आणि भीतीमुळे मी रडायचे. भोजनासाठी एक सिंगल बर्नर प्रोपेन स्टोव होता आणि स्लीपिंग बॅगमध्ये झोपायचे, असे ती सांगते.
अखेर झाली तडजोड
दीर्घ चर्चेनंतर वृक्षाला स्थायी स्वरुपात संरक्षित करण्यात येणार, यावर सहमती झाल्यावर जुलिया झाडावरून खाली उतरण्यास तयार झाली. जुलियाच्या या कामगिरीमुळे अमेरिकेत वृक्षांविषयी जागरुकता निर्माण झाली. जुलिया झाडावरुन खाली उतरताच ती नॅशनल हिरो ठरली होती. तेव्हापासून हिल एक प्रेरक वक्ता, एक उत्तम लेखिका आणि सर्किल ऑफ लाइफ फौंडेशन आणि एंगेज नेटवर्क या स्वयंसेवी संस्थेची सह-संस्थापिका ठरली आहे. ती जगभरात पर्यावरण आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांकरता झटत आहे.