महिलेने सायकलद्वारे केली जगभ्रमंती
सद्यकाळात बहुतांश लोकांना हिंडणे पसंत असते. परंतु प्रत्येक माणसाची हिंडण्याची स्वत:ची पद्धत असते. काही लोक एकटेच फिरणे पसंत करतात. काही लोक कुटुंबीयांसोबत, मित्रांसोबत फिरायला जाणे पसंत करतात. परंतु एका महिलेने सायकलने पूर्ण जगाला प्रदक्षिणा घालत गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वत:चे नाव नोंदविले आहे.
अमेरिकेच्या महिलेने सायकलद्वारे जगभ्रमंती करत गिनिज बुकमध्ये स्वत:चे नाव नोंदवेल आहे. 38 वर्षीय लेल विलकॉक्सने स्वत:चा प्रवास शिकागोतून सुरू करत तेथेच समाप्त केला आहे. या प्रवासात तिला 108 दिवस 12 तास आणि 12 मिनिटे लागली आहेत. 29,169 किलोमीटरपर्यंत सायकल चालवून विलकॉक्सने स्कॉटलंडच्या जेनी ग्रॅहमकडून नोंदविण्यात आलेला विक्रम मोडीत काढला आहे. जेनी ग्रॅहमने हा विक्रम 2018 मध्ये नोंदविला होता.
लेल विलकॉक्सने दरदिनी 14 तास सायकल चालविली आहे. विलकॉक्सने चालू वर्षाच्या 28 मे रोजी 4 खंडांच्या 21 देशांना पार करत 11 सप्टेंबर रोजी शिकागो येथे पोहोचण्याची कामगिरी केली आहे. सायक्लिंग वीकली या नियतकालिकाचे संपादक ऐनी मारिजे रुक यांनी विलकॉक्सला स्वत:ची शारीरिक सहनशक्ती आणि मानसिक दृढतेमुळे स्वत:चे लक्ष्य पूर्ण करण्यास मदत मिळाल्याचे उद्गार काढले आहेत.
विलकॉक्सचा प्रवास
गिनिज बुकच्या नियमांनुसार सायकल चालकाला एका स्थानाहून प्रवास सुरू करत त्याच ठिकाणी परतायचे असते आणि या नियमाचे विलकॉक्सने चांगल्याप्रकारे पालन केले आहे. शिकागोतून प्रवास सुरू केल्यावर विलकॉक्स न्यूयॉर्क येथे पोहोचली आणि तेथून पोर्तुगाल आणि मग अॅमस्टरडॅममार्गे जर्मनी, आल्प्स, बाल्कन, तुर्किये आणि मग जॉर्जियानंतर ती ऑस्ट्रेलियात गेली होती. तिथे तिने ब्रिस्बेनपर्यंतचा प्रवास केला होता. त्यानंतर न्यूझीलंडमार्गे ती लॉज एंजिलिस येथे पोहोचून तेथून शिकागोमध्ये परतली आहे.
विलकॉक्सचे अन्य विक्रम
गिनिज बुकमध्ये स्थान मिळविणारी विलकॉक्स पूर्ण अमेरिकेत सुमारे 6400 किलोमीटरची सायकल दौड जिंकणारी पहिली महिला रायडर आहे. तिने टूर डिवायडरमध्ये देखील विक्रम नोंदविला आहे. यात एका अवघड पर्वतावर जाणारी सायकल दौड सामील असते. परंतु अलिकडे नोंदविलेला विश्वविक्रम माझी सर्वात मोठी कामगिरी असल्याचे विलकॉक्सचे सांगणे आहे.