स्त्री ही स्वाभिमानाचे प्रतिक
प्रतिनिधी/ बेंगळूर
स्त्री ही स्वाभिमानाचे प्रतिक आहे. महिला आज सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहेत. त्यांच्या स्वाभिमानाला धक्का बसला तर लढा देणे हे अपिरिहार्य आहे. कुटुंब, समाज किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात महिला त्यांच्या जबाबदाऱ्या पेलता आल्या नाहीत म्हणून मागे हटल्याची उदाहरणे नाहीत. महिलेला स्वत:चीच एक जबाबदारी असून ती यशस्वीपणे पार पाडत आली आहे, असे प्रतिपादन महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त शनिवारी बेंगळूरच्या रविंद्र कलाक्षेत्र येथे महिला-बालकल्याण खात्यातर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पुरुषांपेक्षा महिलांवर अधिक जबाबदारी असते. घरात आणि घराबाहेर दोन्ही ठिकाणी स्वत:च्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या महिलांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटवत आहेत. महिला तळागाळापासून समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पुढे आल्या आहेत. ध्येय नजरेसमोर ठेवून महिलांनी पुढे वाटचाल करावी, असे आवाहन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.
आयर्न लेडी म्हणून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा आदर्श आपल्यासमोर आहे. श्रीमंत कुटुंबात जन्म झाला तरी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेत घालविल. त्या महिलांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्याचप्रमाणे कित्तूर राणी चन्नम्मा या देखील आमच्या स्वाभिमानाचे प्रतिक आहेत, असेही त्या म्हणाल्या.
6 संस्था, 20 महिलांना कित्तूर राणी चन्नम्मा पुरस्कार
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी परिश्रम घेतलेल्या 6 संस्था व विविधे क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 20 महिलांना महिला दिन कार्यक्रमात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते कित्तूर राणी चन्नम्मा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2024-25 या वर्षात कित्तूर राणी चन्नम्मा पुरस्कार चिक्कमंगळूरमधील जनचिंतन शहर व ग्रामविकास संस्था, बेंगळुरातील फॅमिली प्लानिंग असोसिएशन ऑफ इंडिया, बागलकोट येथील श्री दानेश्वरी महिला यंत्रमाग सहकारी संघ, कारवार जिल्ह्याच्या कुमठा तालुक्यातील दिवगी येथील चेतना सेवा संस्था, यादगिरी येथील रुची ट्रस्ट तसेच हुबळीच्या केशवापूर येथील नवश्री कलाचेतन संस्था प्राप्त झाला आहे.
तर महिला विकासासाठी कार्य करणाऱ्या 8 महिला, कला क्षेत्रातून 5, साहित्य क्षेत्रातून 3, क्रीडा क्षेत्रातून 2, शिक्षण क्षेत्रातून 1, वीर महिला म्हणून एका महिलेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्त्राrशक्ती योजनेंतर्गत उत्कृष्ट कार्य केलेल्या 3 स्वसाहाय्य संघांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला. यात बेळगावमधील ऐश्वर्या स्त्राrशक्ती स्वसाहाय्य संघाचा समावेश आहे.
कार्यक्रमप्रसंगी आमदार उदय गरुडाचार, महिला विकास निगमच्या अध्यक्ष पद्मावती, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. नागलक्ष्मी चौधरी, माजी आमदार सौम्या रेड्डी बाल संरक्षण आयोगाचे अध्यक्ष नागण्णगौड, महिला-बालकल्याण खात्याच्या मुख्य सचिव शाम्ला इक्बाल, मंत्र्यांचे विशेष कर्तव्य अधिकारी बी. एच. निश्चल, महिला विकास निगमच्या व्यवस्थापकीय संचालक पुष्पलता व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.