विकृत, हरामखोरांना चेचून काढायची ताकद स्त्रीमध्ये- चित्राताई वाघ
भाजप रत्नागिरी शहर, दी यश फाऊंडेशन आयोजित मंगळागौर, खेळ पैठणीचा कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद
रत्नागिरी : लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना मनाला खूप वेदना देऊन जातात. सरकार, पोलिस त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. पण आज आपण आई, ताई म्हणून आपलीसुद्धा तेवढी जबाबदारी आहे. समाजात वावरणाऱ्या विकृत, हरामखोरांना चेचून काढायची ताकद स्त्रीमध्ये आहे. उगाच आपल्याला दुर्गा म्हणत नाहीत. समाजकार्य करताना आनंद मिळतोच. प्रवाहाच्या विरुद्ध जाताना काही लांडगे वाईट नजेरेने बघतात. या लांडग्यांना ठोकून काढायची तयारी ठेवा. रस्त्यात कोणी अडचणीत असेल तर ताई, माईला मदत करा. बाई कधी आत्महत्या करत नाही. रस्त्यात कोणा महिलेवर अत्याचार प्रकार होणार असेल तर आपण थांबले पाहिजे. एखादी भगिनी रडताना दिसली तर तुमच्या दोन मिनीटांच्या थांबण्याने फरक पडू शकतो, असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी केले.
भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर आणि दी यश फाउंडेशन संस्था आयोजित मंगळागौर, खेळ पैठणीचा या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शनिवारी दुपारपासून रात्रीपर्यंत जयेश मंगल पार्क येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. त्याप्रसंगी चित्राताईंनी कार्यक्रमाला भेट देऊन लाडके बाळाभाऊ माने, जिल्हाध्यक्ष राजेशभाऊ सावंत आणि सर्व महिला मोर्चाचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला. जयेश मंगल पार्क तुडुंब भरले होते. लाडक्या देवाभाऊंनी संवाद साधल्यानेही महिला खूष होत्या.
आज नटून, सजून, छान, ठेवणीतल्या साड्यांमध्ये सर्व भगिनी दिसत आहेत. काहींच्या नऊवारी साड्यासुद्धा सुरेख आहेत. आज या रत्नागिरीकरांचा उत्साह बघून खूप आनंद झाला. आज सर्वांचे लाडका देवाभाऊ रत्नागिरीकर भगिनींशी बोलले. त्यांचेही आभार मानते. आज मला जन्म बाईचा, बाईचा खूप घाईचा एक आईचा एक ताईचा हे गीत आठवते. या गाण्याचा अर्थ असा की एवढी नाती आहेत. मुलगी, बहिण, सून, काकी, मामी, आत्या कितीतरी भूमिका आहेत. आपल्या सर्व भूमिका पार पाडून आपण समाजासाठी वेळ देतो, परमेश्वराची उत्कृष्ट कला म्हणजे स्त्री. एकटी स्त्री आहे की जिला सृजनाची शक्ती दिली आहे. घरात स्त्री वाघच असते आणि घरचा मंत्री स्त्री आहे. आपल्या सर्वांवर भविष्याची पिढी घडवण्याची जबाबदारी आहे.
या वेळी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवाभाऊ, असा गजर केला. लाडका देवाभाऊने महिलांच्या संरक्षणासाठी वेगवेगळे कायदे आणले. कर्तव्यामध्ये, केसेसमध्ये दिरंगाई केली त्या पोलिसांना घरी बसवण्याचे काम देवाभाऊने केले आहे. त्यामुळे हे सरकार आपले आहे. लाडकी बहिण योजनेचे पैसे आपल्या खात्यात जमा होतात ना, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला. हे पैसे मिळू नयेत म्हणून कॉंग्रेस, उबाठा शिवसेनेने कोर्टाकडे दाद मागितली. परंतु अनेक माता भगिनींना या योजनेचा खूप फायदा होणार असल्याने ही योजना चालू राही, असे चित्रा वाघ म्हणाल्या.
या कार्यक्रमाला दी यश फाउंडेशनच्या सहव्यवस्थापकीय विश्वस्त, सौ. माधवी माने, शिवानी सावंत, सौ. सावंत, भाजप महिला मोर्चा प्रदेश सचिव शिल्पा मराठे, जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, ऐश्वर्या जठार, पल्लवी पाटील, सोनाली आंबेरकर यांच्यासह महिला मोर्चा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
लाडक्या बाळाभाऊंचे कौतुक
रत्नागिरी जिल्ह्यात भाजपाचा बोलबाला करण्यात फार पूर्वीपासून बाळाभाऊ माने काम करत असल्याबद्दल चित्राताई वाघ यांनी कौतुक केले. सर्व माता, भगिनींनी बाळाभाऊंच्या पाठिशी ठामपणे उभे राहा, असे आवाहनही चित्रा वाघ यांनी केले. रत्नागिरी भाजपने अतिशय सुंदर कार्यक्रम केल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले.