पिढ्यानपिढ्यांचा साक्षीदार अखेर इतिहासजमा
खेड / राजू चव्हाण :
तालुक्यातील निळवणे-खोतवाडी येथे मध्यवर्ती ठिकाणी असणारा अन् पिढ्यान्पिढ्यांची साक्ष देणारा महाकाय पिंपळवृक्ष वृक्ष नुकताच कोसळला. हक्काचा विसावा इतिहासजमा झाल्याने ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू तरळले. या पिंपळवृक्षाखाली थकलेले-दमलेले ग्रामस्थ क्षणभर विश्रांतीसाठी थांबत होते. गावातील सुखदुःखाचा निवाडा याचठिकाणी व्हायचा. ग्रामदेवतेच्या पालखीचाही हा पिंपळवृक्ष साक्षीदार बनला होता.
दर शनिवारी, रविवारी गावातील तरुण मंडळी पिंपळवृक्षाखाली सुट्टीचा दिवस मौजमजेने घालवत होते. ग्रामदेवतेच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर याच पिंपळवृक्षाखाली पालखी स्थानापन्न केली जात होती. संपूर्ण गावकरी एकत्रित येऊन याच पिंपळवृक्षाखाली पालखी नाचवत होते. याच पिंपळवृक्षाच्या खाली हनुमान मंदिर आहे. रामनवमी ते हनुमान जयंतीपर्यंत चालणारा अखंड हरिनाम सप्ताह या वृक्षाच्या सावलीखालीच होता. पिंपळाच्या फांद्यांनी या मंदिरावरती जणू छत्रछायाच धरली होती.
- पिंपळवृक्षाच्या छायेत अनेक निवाडे
वर्षानुवर्षे गावातील एकीची भावना जोपासणारा व एकोप्याने वागवणारा पिंपळवृक्ष कोसळल्याने अनेकजण दुःखी झाले आहेत. या महाकाय पिंपळवृक्षाच्या पारावर बसून अनेक जिवाभावाच्या, मैत्रीच्या गोष्टी करायचे. पूर्वी याच पिंपळवृक्षाखाली पारावर बसून गावातील ज्येष्ठ कोणताही सुखदुःखाचा विचार असला तरी त्याचा निवाडा पिंपळवृक्षाखालीच करायचे.