लग्नाचे निमंत्रण दोन लाखांचे!
एपीके फाईलच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांकडून लूट
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
लग्नाचे निमंत्रण या नावाने एपीके फाईल पाठवून निपाणी येथील एका सरकारी अधिकाऱ्याच्या बँक खात्यातून सायबर गुन्हेगारांनी 2 लाख रुपये हडप केले आहेत. यासंबंधी जिल्हा सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
51 वर्षीय प्रशांत यांनी फिर्याद दिली आहे. 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.45 वाजता प्रशांत यांच्या परिचयाच्या राजशेखर यांच्या मोबाईल क्रमांकावरून शादी का निमंत्रण नामक एपीके फाईल आली. परिचयाच्याच व्यक्तीने पाठवलेले निमंत्रण आहे, या समजुतीने त्यांनी त्या फाईलवर क्लिक करताच त्यांच्या बँक खात्यातून 1 लाख 95 हजार रुपये सायबर गुन्हेगारांनी हडप केले.
प्रत्यक्षात 5 ऑक्टोबर रोजी त्यांना एपीके फाईल आली होती. दोन दिवसांनंतर 7 ऑक्टोबर रोजी त्यांच्या बँक खात्यातील रक्कम सायबर गुन्हेगारांनी हडप केली आहे. आरटीओ चलन, प्रधानमंत्री किसान योजना, गॅस बिल या नावांबरोबरच आता शादी का निमंत्रण या नावानेही एपीके फाईल पाठवत बँक ग्राहकांना लुटण्यात येत आहे.