"कला जपणारा… पण स्वतःला विसरलेला योद्धा !"
कुडाळ - पिंगुळी येथील मयुर पिंगुळकर यांचा खास लेख
दशावतार हा नुसती एक कला नसुन ती आपल्या संस्कृतीची जिवंत ओळख आहे. पण या रंगमंचावर जी माणसं आपल्याला रडवतात, हसवतात, विचार करायला लावतात… त्या कलाकारांची जीवनकथा फार वेगळी आणि वेदनादायक असते.प्रत्येक दशावतार कलाकार – हा नुसता एक कलाकार नाही, तो संस्कृतीचा रक्षक आहे. गावोगावी फिरत, रात्री अपरात्री रात्रभर रंगभूमीवर उभं राहत कधी गणपती, विष्णु, शंकर, कृष्ण तर कधी राम बनुन आपल्या आराध्य देवांची रुपं साकारतो , तर कधी नारदाच्या रुपात प्रेक्षकांना खळखळून हसवतो. पण हे करत असताना… तो स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतो.तब्बेतीची चिंता नाही, पावसाचं भय नाही, थंडी-उन्हाची पर्वा नाही. आजारी असूनही रंगभूमी सोडत नाही… कारण त्याच्या मनात एकच गोष्ट असते – "आपली परंपरा जपायची आणि प्रेक्षकांना आनंद देणे "घरात बायको, मुलं, आई-वडील वाट बघत असतात… पण तो मात्र दुसऱ्यांना आनंद देण्यात व्यस्त असतो.रात्री तीन-तीन वाजेपर्यंत प्रयोग, दिवसभर प्रवास… खाणं, झोप, विश्रांती यांना काही वेळापत्रक नाही.तो ‘कलावंत’ नसतो… तो ‘योध्दा’ असतो.पण आज समाजाकडून त्याला मिळतो काय? थोडं कौतुक, एक टाळी… आणि विस्मरण.कोण विचारतो त्याला "तुझी तब्बेत कशी आहे रे?"कोण देतो त्याच्या मुलांच्या शिक्षणाचा भार उचलायला मदत?कोण विचारतो त्याच्या जुन्या गुडघ्याच्या वेदनेबद्दल? कोणीच नाही.पण तरीही, प्रत्येक वर्षी नव्या जोमानं, नव्या रुपात, नव्या जोशात तो कलाकार पुन्हा उभा राहतो – फक्त आपल्या संस्कृतीसाठी.त्याला ना पुरस्कार हवे, ना मोठ्या मंचाची आस. त्याला हवी असते फक्त थोडीशी ओळख… आणि आपल्या कलेला थोडंसं जपणं.चला, आपण प्रत्येक दशावतार कलाकाराला केवळ मनोरंजन करणारा मानू नका…त्याला ‘संस्कृतीचा खरा योद्धा’ म्हणून सलाम करूया!