जगज्जेत्या कर्णधाराचे घरी जंगी स्वागत
बालपणीच्या मित्रांनी केला सॅल्युट : रंगीबेरंगी फुलांनी सजवले घर
वृत्तसंस्था/ मुंबई
टी 20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय संघ पाच दिवसानंतर मायभूमीत दाखल झाला. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर टीम इंडिया मुंबईत दाखल झाली. मुंबईत नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम दरम्यान भारतीय क्रिकेट संघाची विजयी परेड काढण्यात आली. या विजयी परेडचे साक्षीदार होण्यासाठी लाखो मुंबईकरांनी तोबा गर्दी केली होती. या परेडनंतर रोहित शर्मा घरी पोहोचला, यावेळी त्याच्या बालपणीच्या मित्रांनी जंगी स्वागत केले.
गुरुवारी रात्री विजयी परेडनंतर वानखेडे स्टेडियमवर खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या रोड शोनंतर सर्व खेळाडूंनी आपापल्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. घरी पोहोचताच सर्व चॅम्पियन्ससाठी सेलिब्रेशनची खास व्यवस्था करण्यात आली होती. असंच काहीसं रोहित शर्मासोबतही पाहायला मिळालं. रोहितचे त्याच्या घरी जंगी स्वागत झाले. त्याचे कुटुंबीय, बालपणीचे मित्र आणि मुंबई इंडियन्स संघातील सहकारी तिलक वर्मा यांनी त्याच्या स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. रोहितच्या बालपणीच्या मित्रांनी अणि तिलक वर्मा यांनी रोहित शर्माचे नाव आणि चित्र असलेले टी शर्ट घातले, तर रोहितने ट्रोफी घेताना जी स्टाईल केली होती ती स्टाईल या मित्रांनी केली. रोहितला खांद्यावर घेऊन नाचले, सॅल्युटही केले, त्याच्या गळ्यात हार घातला. अशा पद्धतीने रोहितच्या भव्य स्वागताचा सोहळा त्याच्या घरी पार पडला.