अतिचारी सिंहस्थ गुरुमुळे जगभर युद्धसदृश वातावरण
ज्योतिष मित्रमंडळाच्या बैठकीत देशपांडे यांचे प्रतिपादन
त. भा. प्रतिनिधी / बेळगाव
येत्या 31 ऑक्टोबर रोजी गुरु हा अतिचारी अवस्थेत सिंह राशीत प्रवेश करेल. सिंह ही अग्नितत्वाची रास असून त्यातील मघा हे पितर देवता असलेल्या नक्षत्रात अगोदरच मंगळ आणि केतू स्थिर आहेत. तिथे गुरुचे आगमन झाले की मीन राशीतील न्यायाधीश शनीशी या तीन ग्रहांचा षडाष्टक योग बनेल. या क्रूर ग्रहगोचर भ्रमणामुळे 24 जानेवारीपर्यंत संपूर्ण जगभर युद्धसदृश वातावरणाची निर्मिती होऊन सगळीकडेच वणवा पेटल्याची स्थिती झाल्यास नवल वाटणार नाही, असे भाकित अभ्यासक अशोक देशपांडे यांनी केले. ज्योतिष मित्रमंडळाच्या मासिक बैठकीत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, संत आणि असंत या दोन प्रवृत्ती समाजात वावरत असतात. त्यांच्या मतविरोधी विचारसरणीमुळे शांत वातावरणाचा विस्फोट होऊन सामान्य जनतेला त्याची फळे भोगावी लागतात. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था कोलमडून पडण्याची शक्यता निर्माण होते.
2026 संपण्यापूर्वी मध्य आशियातील एखाद्या देशाच्या सत्ताधारी नेत्याचा वध होण्याची तीव्र शक्यता असून त्यामुळे पुढे घडणारी तिसऱ्या महायुद्धाची नांदी ठरेल. त्यामुळे 2027, 2028 आणि 2029 ही तीन वर्षे जगाला घातक असून 2032 पर्यंत या अतिचारी गुरुच्या भ्रमणाचा जगाला त्रास सहन करावा लागेल. काही देशांचे नकाशावरून नाव पुसले जाईल तर काही नवीन देश उदयाला येतील, असे त्यांनी नमूद केले. शिवाजी शहापूरकर यांनी आभार मानले.
