7 लाख वर्षांनी जागृत होणार इराणमधील ज्वालामुखी
इराणच्या दक्षिणपूर्व भागात स्थित माउंट तफ्तान ज्वालामुखी मागील जवळपास 7 लाख वर्षांपासून निद्रिस्त अवस्थेत होता, परंतु आता तो जागृत होत असल्याचे संकेत दिसून येत आहेत. वैज्ञानिकांच्या एका नव्या अध्ययनानुसार या ज्वालामुखीच्या शिखरावर जमीन वर उचलली जात असून तो दबाव वाढण्याचा संकेत आहे. हा शोध युरोपीय अंतराळ संस्थेच्या सेंटिनल-1 उपग्रहाकडून मिळालेल्या डाटावर आधारित आहे.
जुलै 2023 ते मे 2024 दरम्यान तफ्तानच्या शिखरानजीक जमीन सुमारे 9 सेंटीमीटर वर उचलली गेली आहे. ही प्रक्रिया हळूहळू घडली आहे. वैज्ञानिकांनी इंटरफेरोमेट्रिक सिंथेटिक अपर्चर रडार तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, हे तंत्रज्ञान जमिनीच्या किंचित हालचालीलाही टिपणारे आहे. एक नव्या ‘कॉमन-मोड फिल्टरिंग’ प्रक्रियेद्वारे वायुमंडळील ध्वनीला हटवून डाटा आणखी सुस्पष्ट करण्यात आला, ज्यामुळे हा उठाव स्पष्ट दिसून येतो. हा दबावाचा स्रोत शिखरापासून केवळ 490 ते 630 मीटर खोलवर आहे.

कारण काय आहे?
हा उठाव ज्वालामुखीय वायू किंवा तप्त पाणी (हायड्रोथर्मल सिस्टीम) जमा झाल्याने होत असून ते शिखराला फुग्याप्रमाणे फुगवत आहे. खोलवर मॅग्माची किंचित हालचालही असू शकते, असे वैज्ञानिकांचे मानणे आहे.
स्थानिक संकेत : 2023 पासून भागातील लोक गंधाचा तीव्र दुर्गंध आणि वायू निघत असल्याची तक्रार करत आहेत. अध्ययनादरम्यान दररोज सुमारे 20 टन सल्फर डायऑक्साड वायू बाहेर पडत असल्याचा अनुमान आहे.
अन्य कारण फेटाळले : पाऊस किंवा भूकंपाला कारण मानले गेले नाही, कारण त्यादरम्यान कुठलाच भूकंप झाला नाही आणि पाऊसही कमी होता. पूर्वी तफ्तानला ‘विलुप्त’ मानले जात होते, परंतु आता याला ‘सुप्त’ म्हटले जात आहे.
ज्वालामुखीची माहिती
तफ्तान इराणचा एक स्ट्रेटोवॉल्केनो असून तो पाकिस्तानच्या सीमेनजीक सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांतात स्थित आहे. याची उंची सुमारे 3940 मीटर आहे. हा मकरान सबडक्शन झोनमध्ये असून तेथे अरेबियन प्लेट यूरेशियन प्लेटच्या खाली सरकत आहे. शिखरावर फ्यूमरोल (वायू बाहेर पडणारे छिद्र) नेहमी सक्रीय असते, जे उष्णतेचा संकेत देते.