For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशसेवेत मग्न गाव

06:33 AM Oct 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
देशसेवेत मग्न गाव
Advertisement

सैनिक करत असलेली देशभक्ती अतुलनीय आहे. कारण, वेळप्रसंगी आपल्या प्राणांची पर्वा न करता त्याला देशाच्या सीमांचे संरक्षण करावे लागते. सैनिक नसते तर देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व संपले असते आणि भारत त्याच्या शत्रूंच्या हाती पडला असता. त्यामुळे सैनिकाचा मान मोठा असतो. सैन्यात प्रवेश करणे ही देशभक्तीची परमावधी मानण्यात येते. भारतात अशी अनेक गावे आहेत, की ज्यांच्यातील बहुतेक सर्व घरांमध्ये पिढ्यानपिढ्या सैनिक जन्माला येतात. संपूर्ण गावच जणू देशसेवा करत असते. अशाच एका गावाची माहिती सर्वांना असणे आवश्यक आहे. हे गाव भारताच्या सीमेवरच असणाऱ्या लद्दाख या प्रदेशातील आहे. त्याचे नाव चूशोत असे असून या गावात अवघी 63 घरे आहेत. भारताच्या सैन्याशी हे गाव गेल्या अनेक दशकांपासून जोडले गेले आहे. या गावातील बहुतेक सर्व युवक सैन्यात आहेत. त्यांच्यापैकी अनेकांची नियुक्ती त्यांच्या गावापासून नजीक असणाऱ्या सीमावर्ती भागांमध्येच करण्यात आली आहे. लद्दाखची भारतीय सीमा चीनला लागून आहे. स्वातंत्र्योत्तर काळातच नव्हे, तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून या गावातील अनेक पिढ्या सैनिक सेवेत व्यतीत झालेल्या आहेत. या गावातील युवक सेनेत जाणे ही येथे आश्चर्यकारक घटना मानली जात नाही. उलट एखाद्या घरातील कोणीच सैनिक नसेल, तर तो चर्चेचा विषय होतो. या गावात बाहेरुन कोणी आले, तर त्याला हे गाव सैनिकांचे आहे असे वाटणारच नाही, इतके या गावातील लोक शांत आणि सौम्य स्वभावाचे आहेत. नैसर्गिक परिस्थितीमुळेच त्यांच्यात एकमेकांना साहाय्य करणे, एकोप्याने राहणे, संकटांशी दोन हात एकत्र येऊन करणे आणि पराक्रमाची जोपासना करणे हे गुण निर्माण झाले आहेत. या गावात अशी अनेक घरे आहेत की ज्यांच्या गेल्या पाच किंवा त्याहूनही अधिक पिढ्यांमध्ये कोणीना कोणी पुरुषाने सैन्यात सेवा दिलेली आहे. बहुतेक घरांमधले तरुण सैन्यात असल्याने घरात केवळ या सैनिकांचे मातापिता, पत्नी, मुले किंवा निवृत्त सैनिक रहात असल्याचे दिसून येते. आपले पती सैन्यात आहेत, हे या गावातील प्रत्येक घरातील महिला अभिमानाने इतरांपाशी बोलताना दिसतात. या गावातील अनेक सैनिकांनी देशाचे संरक्षण करताना हौतात्म्यही स्वीकारलेले आहे. संपूर्ण लद्दाख प्रदेशात या गावाची ख्याती असून याचा गावकऱ्यांनाही गर्व आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.