आधुनिक सुविधांपासून दूर राहणारे गाव
सद्यकाळात वीजेसारखी मूलभूत सुविधाही न वापरणाऱ्या गावाची कल्पना कुणी करू शकत नाही. एकीकडे प्रत्येक पावलावर लोकांना वीज किंवा इंटरनेटची गरज भासते, तर सरकार देखील आदर्श ग्राम यासारखी योजना राबवत असून गावांना आधुनिक सुविधांनी युक्त करू पाहत आहे. परंतु आंध्रप्रदेशातील एक गाव वीज, गॅस, इंटरनेट किंवा कुठल्याही मोटर-मशीनपासून दूर राहिले आहे.
सरकारने मूलभूत सुविधा या गावांपर्यंत पोहोचविल्या नाहीत हे याचे कारण नाही. प्रत्यक्षात आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलम शहरापासून 60 किलोमीटर अंतरावरील कुर्मा गावाचे लोक या सुविधांपासून दूर राहू इच्छितात. या गावाला आधुनिक संपर्कव्यवस्था नको आहे. हे लोक स्वत:चे जीवन पारंपरिक पद्धतीने आणि आत्मनिर्भर होत जगू इच्छितात. याचमुळे हे गाव आता चर्चेत आले आहे.
या गावातील सर्व घरांना ‘पेनकुट्टीलू’ म्हटले जाते. या गावातील मुलं शाळेत नव्हे तर गुरुकुलमध्ये शिक्षण घेतात. तेथे त्यांना पुस्तकी ज्ञानासह ध्यानधारणा, नैतिक शिक्षण, उच्चविचारांचे धडे दिले जातात. या गुरुकुलात शिकणारी मुले प्राचीनकाळाप्रमाणे पहाटे साडेतीन वाजता उठतात आणि जापम, ध्यान, आरनीतंर 9 वाजल्यापासून वर्गात जात शिक्षण घेतात.
भौतिक सुविधांचा त्याग
येथील लोकांनी स्वत:च भौतिक सुविधांचा त्याग केला आहे. हे लोक वैदिक काळाचे अनुकरण करू इच्छितात आणि निसर्गावर अत्यंत विश्वास ठेवतात. येथील घरं विटा किंवा सीमेंटपासून नव्हे तर माती आणि चुन्यापासून तयार करण्यात आली आहेत. पूर्ण गावात एक लँडलाइन फोन असून याचा वापर सर्व ग्रामस्थ करतात. या लोकांनी अध्यात्मिक मार्गावर वाटचाल करण्याचा निर्णय घेतला आहे.
विदेशातून येत आहेत लोक
येथे अनेक लोक आता बाहेरून येत स्थायिक होऊ इच्छित आहेत. काही विदेशी लोक देखील या गावात राहू लागले आहेत. त्यांनी येथील वास्तव्य अत्यंत पसंत पडले आहे. यामुळे हे गाव आता केवळ देशातच नव्हे तर विदेशात देखील चर्चेचा विषय ठरले आहे.