पाणबुडीतून घेता येणार समुद्राच्या तळाशी असलेल्या द्वारका नगरीचे दर्शन
श्रीकृष्णाचं जन्मस्थान असलेली द्वारका नगरी हजारो वर्षांपूर्वी समुद्राच्या तळाशी गेली होती. मात्र या नगरीचं दर्शन घेणं आता सहज शक्य होणार आहे. गुजरात सरकार यासाठी विशेष पाणबुडी सफर सुरू करणार आहे.
माध्यम वृत्तानुसार, या पाणबुडीमध्ये एका वेळी 30 लोक प्रवास करू शकतील. सुमारे 35 टन वजनाच्या या पाणबुडीतून समुद्रामध्ये 300 फूट खोलीवर पर्यटकांना नेण्यात येईल. या पाणबुडीमध्ये दोन डायव्हर आणि एक मार्गदर्शक असणार आहेत.हा एकूण प्रवास दोन ते अडीच तासांचा असणार आहे. समुद्राच्या खाली जायचं म्हणजे त्यासाठी तिकीट देखील तेवढंच महाग असणार आहे. मात्र, सर्वसामान्यांना देखील यातून प्रवास करता यावा यासाठी गुजरात सरकार सबसिडी देण्याचा विचार करत आहे.
भाजप सरकार देशातील धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध योजनांवर काम करत आहे. काशी-विश्वनाथ कॉरिडोअर, महाकाल लोक, अयोध्या, केदारनाथ, सोमनाथ आणि द्वारका कॉरिडोअर अशा योजनांवर वेगाने काम सुरू आहे.