Goa Update दुर्दैवी! उघड्यावर कचरा टाकल्याची क्लिप व्हायरल झाली आणि गोव्याच्या त्या तरुणाने स्वत:ला संपवलं
गोव्यातून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. गोव्याच्या म्हापसा येथील एका २३ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याने शुक्रवारी गोळी झाडून स्वत:चा शेवट केला. रस्त्याच्या कडेला कचरा फेकत असल्याचा त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि त्याप्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर काही तासांतच ही घटना घडली.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, सॅम्युअल डी ब्रागांकाच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले जातील. सॅम्युअल आपल्या आई आणि दोन बहिणींसोबत राहत होता आणि त्याने नुकतेच पदवीचे दुसरे वर्ष पूर्ण केले होते.एका नागरिकाने गुरुवारी ब्रागांका कचरा टाकत असल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. व्हिडिओमध्ये, तो नागरिक त्याला कचरा काढण्याची विनंती करताना आणि तसे केल्यास क्लिप डिलीट करतो असं म्हणताना दिसत आहे.
पोलिस काय म्हणतात?
म्हापसाचे एसपी सलीम शेख यांनी सांगितले की, पोलिसांनी व्हिडिओची दखल घेतली आणि कचऱ्याबाबत तक्रार मिळाल्यानंतर गोवा अविघटनशील कचरा (नियंत्रण) कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, ब्रागांका यांनी “जाणूनबुजून, निष्काळजीपणे आणि बेकायदेशीरपणे” सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून त्रास आणि आरोग्यास धोका निर्माण केला, तसेच सार्वजनिक सुरक्षा आणि स्वच्छतेला धोका पोहोचवला.
म्हापसाचे पोलिस अधीक्षक पुढे म्हणाले “कायद्यानुसार, आरोपीला सहसा दंड भरावा लागतो. तुरुंगवासाचीही तरतूद आहे. आम्ही त्याला (ब्रागान्काला) पोलीस ठाण्यात बोलावले. त्याला नोटीस बजावण्यात आली आणि घरी जाण्याची परवानगी देण्यात आली,” असे शेख म्हणाले.
अचानक गोळीबार
ब्रागांकाची आई आणि त्याची एक बहीणही पोलीस ठाण्यात आल्या होत्या आणि नंतर त्या एकत्र निघून गेल्या, असे एसपींनी सांगितले.शुक्रवारी पहाटे सुमारे दीड वाजता, पोलिसांना कुटुंबाच्या घरात गोळीबार झाल्याचा फोन आला. पोलीस ब्रागांकाच्या घरी गेले असता, त्यांनी बाथरूममध्ये स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचे आढळले, असे शेख यांनी सांगितले. मृत ब्रागांकाने पिस्तुल कुठून मिळवली? याचा पोलिस तपास सुरू आहे.