For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंत्र्यांबरोबर आज होणार व्हिडिओ कॉन्फरन्स

10:44 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
मंत्र्यांबरोबर आज होणार व्हिडिओ कॉन्फरन्स
Advertisement

मनपाच्या विविध समस्यांसह कर मुदतवाढ संदर्भातही होणार चर्चा?

Advertisement

बेळगाव : दोन दिवसांपूर्वी महानगरपालिकेमध्ये बुडा आयुक्तांसह महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नगरविकासमंत्र्यांनी चर्चा केली होती. त्यादिवशी केवळ बुडा आयुक्तांना विविध सूचना करण्यात आल्या. मंत्र्यांना वेळ नसल्याने व्हिडिओ कॉन्फरन्स पुढे ढकलण्यात आली होती. शुक्रवारी पुन्हा व्हिडिओ कॉन्फरन्स होणार असून महानगरपालिकेच्या विविध समस्यांवर चर्चा होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. नगरविकास मंत्री भैरत्ती सुरेश यांनी राज्यातील सर्वच महानगरपालिका, बुडा, नगरपालिका, नगरपंचायती यांच्या अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा सुरू केली आहे. विविध प्रकल्प तसेच समस्या सोडविण्याबाबत मार्गदर्शन करत आहेत. विविध प्रकल्प राबविण्याबाबतही ते सूचना करत आहेत. नुकत्याच झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये नवीन वसाहती निर्माण करण्याबाबत बुडा आयुक्तांना सूचना केली आहे. महानगरपालिकेलाही विविध समस्या भेडसावत आहेत. यावर्षी शहरातील जनतेला कर भरताना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. सवलतीच्या दरात कर भरण्यासाठी मुदतवाढ करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत महानगरपालिकेनेही नगरविकास खात्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र त्या प्रस्तावाबाबत सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. मे महिन्यामध्ये सवलत नसताना नागरिकांना कर भरावा लागला आहे. तेव्हा किमान 1 महिना सवलतीत वाढ करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.