खांद्यांवर फार मोठी जबाबदारी !
‘बीसीसीआय’च्या राष्ट्रीय पुरुष संघासाठीच्या निवड समितीचा प्रमुख म्हणून अजित आगरकरच्या जागी माजी भारतीय फिरकीपटू प्रज्ञान ओझाची निवड होईल अशी अटकळ बऱ्याच काळापासून व्यक्त होऊ लागली होती. ती खरी ठरलीय...ओझाला आता या भूमिकेला न्याय देताना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागणार असून त्यापैकी सर्वांत मोठं एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचं...
‘त्याचं’ नाव क्रिकेटच्या गौरवशाली इतिहासात नोंदवलं गेलंय ते महान ऑफस्पीनर मुथय्या मुरलीधरनचा 800 वा कसोटी बळी ठरल्यानं...त्यानंतर 16 वर्षांनी भारताचा हा 40 वर्षीय माजी फिरकी गोलंदाज भारतीय पुऊष क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी विराजमान झालाय...सदर पद भारताच्या क्रिकेटमधील अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित स्थानांपैकी एक...एकेकाळचा फिरकीपटू रमेश पोवारची पाच सदस्यीय निवड समितीत नियुक्ती झाल्यानंतर सर्वाधिक कसोटी सामने (24) खेळलेला खेळाडू म्हणून ‘त्याच्या’कडे प्रमुख पदाची जबाबदारी आलीय...प्रज्ञान ओझा...
ओझासाठी अजित आगरकरकडून ही जबाबदारी स्वीकारणं आव्हानात्मक ठरू शकतं. कारण संघाच्या संक्रमण काळात आगरकरनं काही धाडसी निर्णय घेतले होते. कार्यकाळाच्या तिसऱ्या वर्षाच्या उत्तरार्धातील त्याचे कठोर व स्पष्ट दृष्टिकोन बीसीसीआय’ला हाताळणं कठीण झालं होतं...मात्र प्रज्ञानकडून संघर्षाची भूमिका घेतली जाण्याची शक्यता कमीच. रोहित शर्माच्या एकदिवसीय क्रिकेटमधील सातत्याबाबत निर्माण झालेल्या वादळानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला परिस्थिती शांत करू शकेल अशा व्यक्तीची गरज होती. ओझा ती संयमी भूमिका निभावू शकतो...
जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर असताना रोहित शर्माच्या कामगिरीवरील निवड समितीची नाराजी कळविण्याची जबाबदारी ओझावरच होती. या विषयावर त्याचं स्वत:चं वैयक्तिक मत काय होतं किंवा त्यानं आपल्या जुन्या ‘आयपीएल’ संघातींल अन् भारतीय चमूतील सहकाऱ्याला नेमकं काय सांगितलं ते स्पष्ट झालेलं नाहीये...‘इंडियन प्रीमियर लीग’च्या सुऊवातीच्या काळात ओझा नि रोहित ‘डेक्कन चार्जर्स’ संघासाठी एकत्र खेळले...
कठीण प्रसंगी त्यानं अनेकदा निरोप पोहोचविण्याचं काम केलंय. 2020 च्या फेब्रुवारी महिन्यात निवृत्त झालेल्या ओझानं निवड समितीत दाखल झाल्यानंतर खेळाडूंशी असलेल्या त्याच्या जवळच्या संबंधांचा व्यवस्थित उपयोग केलाय. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर नि दिग्गज फलंदाज विराट कोहली यांच्यातील संवादाचा अभाव भरून काढण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम केलं होतं ते त्यानंच. प्रज्ञाननं कोहलीशी चर्चा करून परिस्थिती निवळावी यासाठी प्रयत्न केले...
निवड समितीत पोहोचण्यापूर्वी प्रज्ञान ओझा ‘लेजंड्स’ म्हणजेच माजी खेळाडूंच्या क्रिकेट विश्वात सक्रिय होता. त्याच्या कसोटी कारकिर्दीवर गदा आली ती गोलंदाजीच्या शैलीवर 2014 मध्ये संशय व्यक्त करण्यात आल्यानं. त्यानंतर त्याला गोलंदाजी सुधारण्यासाठीच्या प्रक्रियेतून जावं लागलं. 2015 साली प्रज्ञानला पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी अधिकृत मंजुरी मिळाली खरी, परंतु त्यानंतर तो पूर्वीसारखा प्रभावी ठरू शकला नाही. याचा परिणाम म्हणून त्याला राष्ट्रीय संघातून वगळण्यात आलं...नोव्हेंबर, 2013 मध्ये वेस्ट इंडिजविऊद्ध मुंबईत झालेल्या कसोटीत ओझानं 10 बळी घेण्याची कामगिरी केली होती. तीच त्याची अखेरची कसोटी लढत ठरली. पण हा सामना सर्वांच्या स्मरणात राहिला तो महान सचिन तेंडुलकरचीही ती शेवटची ‘टेस्ट’ असल्यानं...
निवड समितीच्या इतर सर्व प्रमुखांप्रमाणंच ओझाचं मूल्यमापनही ‘आयसीसी’ स्पर्धांमधील भारताच्या कामगिरीच्या आधारावरच केलं जाईल. समितीचं मुख्य उद्दिष्ट 2027 च्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात प्रबळ दावेदारी पेश करू शकेल असा संघ तयार करण्याचं असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही. सध्या तरी त्या आफ्रिका दौऱ्याच्या दृष्टीनं निवड समितीनं रोहित शर्माच्या अनुभवावर विश्वास दाखविलाय असं दिसतंय. जर या माजी कर्णधाराच्या फॉर्म किंवा तंदुरुस्तीमध्ये घसरण झाली, तर मात्र प्रज्ञानच्या समितीसमोरील आव्हानं अधिक कठीण होऊ शकतात.
सध्या निवड समितीच्या बैठकांमध्ये ओझासोबत व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांचाही सहभाग असतो. ‘बीसीसीआय’च्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे प्रमुख म्हणून लक्ष्मण यांची उपस्थिती निवड समिती व खेळाडूंमध्ये उपलब्धतेवरून निर्माण होणारे मतभेद सोडवण्यासाठी असते. मात्र 134 कसोटी सामन्यांचा अनुभव असलेला एक दिग्गज क्रिकेटपटू जेव्हा हजर राहतो तेव्हा इतरांवर त्याचं दडपण येणं साहजिक. त्यातच निवड समितीतील सदस्यांचा एकूण कसोटी अनुभव जमेस धरला, तर तो केवळ 69 लढतींइतका. त्यामुळं ही परिस्थिती भविष्यात कशी हाताळले जाते त्याकडे सर्वांचं लक्ष असेल...
तथापि, लक्ष्मण नि ओझा यांचे वैयक्तिक संबंध खूप चांगले आहेत. ओडिशात जन्मलेला प्रज्ञान हैदराबादकडून देशांतर्गत क्रिकेट खेळला आणि या नवीन भूमिकेत त्याला लक्ष्मण यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचं मानलं जातंय. तो खेळत होता तेव्हा 2010 च्या मोहाली कसोटीत ऑस्ट्रेलियाविऊद्ध शेवटच्या गड्यासाठी त्यानं ‘व्हीव्हीएस’सोबत केलेली विजयी भागीदारी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अजरामर झालीय...
भारतीय क्रिकेटमधील अन्य महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांशी देखील त्याचे वैयक्तिक संबंध चांगले आहेत. मात्र दिलीप वेंगसरकर यांच्यासारख्या प्रभावी निवड समिती अध्यक्षांकडे चिकित्सक विचार करण्याची विशेष क्षमता होती...प्रज्ञान ओझा गुणवत्तेवर आधारित निवड प्रक्रिया किती प्रभावीपणे राबवू शकतो अन् आधुनिक क्रिकेट कॅलेंडरच्या गुंतागुंतीच्या रचनेत विविध स्वरुपांच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं स्वत:ला किती सक्षम सिद्ध करू शकतो ते पाहावं लागेल !
मैदानावरील कामगिरी...
- डावखुरा फिरकी गोलंदाज असलेला प्रज्ञान ओझा 2008 ते 2013 या काळात 48 आंतरराष्ट्रीय सामने खेळला. त्यामध्ये 24 कसोटी, 18 एकदिवसीय आणि सहा टी-20 सामन्यांचा समावेश..
- भारतातर्फे 2013 मध्ये वेस्ट इंडिजविऊद्धचा खेळलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात ओझानं 89 धावांत 10 बळी मिळवले. त्यामुळं त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं..
- त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 30.26 च्या सरासरीनं एकूण 113 बळी, एकदिवसीय सामन्यांत 21 बळी आणि टी-20 सामन्यांत 6.28 च्या ‘इकेनॉमी रेट’नं 10 बळी घेतले...
- ओझानं हैदराबादकडून आपल्या देशांतर्गत कारकिर्दीची सुऊवात केली ती 2005 मध्ये आणि 2008 साली बांगलादेशविऊद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं...
- 2015 मध्ये त्यानं हैदराबाद सोडून इतर संघांकडून खेळण्याचा निर्णय घेतला अन् 2015-16 व 2016-17 च्या हंगामांत बंगालचं प्रतिनिधीत्व केलं...2017 साली ओझा हैदराबादला परतला, परंतु केवळ एका हंगामासाठी...त्यानंतर 2018 च्या अखेरीस तो बिहारच्या संघात सामील झाला. त्यांच्यासाठी तो तीन एकदिवसीय सामने व एक प्रथम श्रेणी लढत खेळला...
- प्रज्ञाननं आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीचा शेवट 108 सामन्यांत 424 बळींसह केला. त्याची सरासरी 28.60 इतकी राहिली...त्यानं 23 वेळा एका डावात पाच बळी अन् तीन वेळा एका सामन्यात 10 बळी घेण्याचा पराक्रम केला....देशी स्तरावरील 50 षटकांच्या सामन्यांचा विचार केल्यास त्याच्या खात्यात आहेत ते 103 लढतींतील 123 बळी, तर 142 टी-20 सामन्यांतून 156 बळी...
- ‘आयपीएल’मध्ये तो 2008 ते 2011 या काळात डेक्कन चार्जर्ससाठी अन् 2012 ते 2015 दरम्यान मुंबई इंडियन्ससाठी खेळला...2009 मध्ये त्यानं 18 बळी घेऊन डेक्कन चार्जर्सला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. 2010 साली तो 21 फलंदाजांना टिपून स्पर्धेतील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता...
मैदानाबाहेरील प्रवास...
- फेब्रुवारी, 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्याच वर्षाच्या उत्तरार्धात ‘इंडियन क्रिकेटर्स असोसिएशन’द्वारे प्रज्ञान ओझाची ‘आयपीएल कार्यकारी मंडळा’तील प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली...
- सप्टेंबर, 2025 मध्ये ‘बीसीसीआय’च्या 94 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत, भारताचा माजी वेगवान गोलंदाज आर. पी. सिंगसोबत ओझाची निवड समितीवर वर्णी लागली...समितीमध्ये वर्षभरापेक्षा थोडा अधिक काळ वावरलेला असतानाही आता त्याच्याकडे अध्यक्षपदाची धुरा चालून आलीय...
- राजू प्रभू
