रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षात उभी फूट
वीरेश बोरकर बनले स्वयंघोषीत राष्ट्रीय अध्यक्ष : घटनेत राष्ट्रीय अध्यक्षपद नाहीच : विश्वेश नाईक
त. भा. प्रतिनिधी
पणजी : गोव्यात एकमेव आमदार असलेल्या रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षात उभी फूट पडल्याचे समोर आले असून आमदार वीरेश बोरकर यांनी स्वत: पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित केले आहे. दुसऱ्या बाजूने बोरकर यांनी जारी केलेली पत्रके, वक्तव्ये असे सर्व काही अनाधिकृत असल्याचा दावा पक्षाचे सरचिटणीस विश्वेश नाईक यांनी केला आहे. या परस्पर विरोधी दाव्यांमुळे पक्षात दोन गटांसह फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
आमदार वीरेश बोरकर यांनी जाहीर केलेले सर्व निर्णय अनाधिकृत असून त्यास आरजी पक्षाची मान्यता नाही आणि ते निर्णय पक्षावर बंधनकारक नसल्याचा खुलासा नाईक यांनी केला आहे. खजिनदार व सरचिटणीस यांना निलंबित करण्यात आल्याचे सोशल मीडियातून फिरणारे संदेश चुकीचे असल्याचे नाईक यांनी म्हटले असून त्यास पक्षाची अधिकृत मान्यता नाही, असेही नाईक यांनी पत्रकातून नमूद केले आहे. ते निर्णय पक्षाने घेतलेले नाहीत आणि त्यास कायदेशीर मान्यता व वैधता नसल्याचे नाईक यांनी म्हटले आहे. पक्षाचे समर्थक, मतदार, सदस्य व जनतेने आणि इतर सर्वांनी पक्षाच्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन नाईक यांनी केले आहे.
बोरकर यांना ‘व्हीप’ बजावण्याचे अधिकार नाहीत
पक्षाच्या अधिकृत घटनेनुसार राष्ट्रीय अध्यक्ष हे पदच अस्तित्वात नाही. त्यामुळे बोरकर हे आरजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊच शकत नाहीत. बोरकर यांना ‘व्हीप’ बजावण्याचे अधिकार नाहीत. पक्षाच्या सर्व प्रकारच्या समित्या, सीईसी (केंद्रीय समिती) अस्तित्वात व कार्यरत आहेत. पक्षाचे नोंदणीकृत कार्यालय पाटो पणजी येथे असून ते नेवरा येथे नाही तसेच आमदार बोरकर यांनी वापरलेली पक्षाची पत्रके, स्टँप अधिकृत नसल्याचे नाईक यांनी म्हटले आहे.
सर्व समित्या बरखास्त
दरम्यान, आमदार बोरकर यांनी स्वतंत्र पत्रक काढून राज्य, जिल्हा, तालुका व गट पातळीवर सर्व समित्या बरखास्त केल्या आहेत. त्यांची येत्या 45 दिवसात निवडणूक घेऊन पुन्हा समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे. खजिनदार अजय खोलकर व सरचिटणीस विश्वेश नाईक यांना निलंबित केल्याचे बोरकर यांनी कळवले आहे. बोरकर यांचे समर्थक असलेल्या ज्या 10 जणांना मागे पक्षातून निलंबित करण्यात आले होते. त्यांचे निलंबन रद्द झाल्याची माहिती बोरकर यांनी दिली आहे. या प्रकारामुळे आरजी पक्षात दोन गट पडल्याचे समोर आले आहे.