उबाठा शिवसेनेत पडली उभी फूट
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा एकदा फुटीचा दणका बसला आहे. त्यांच्या पक्षाच्या 9 लोकसभा खासदारांपैकी 6 जणांनी वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून हा गट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होणार आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे महाराष्ट्राच्या विधानसभेतील 16 आमदारही बाहेर पडण्यासाठी सज्ज असल्याचे दिसत आहे.
बुधवारी पहाटेपासून मुंबईत आणि दिल्लीत हालचालींना प्रचंड वेग आला. उद्धव ठाकरेंचे सहा लोकसभा खासदार मध्यरात्री दोन स्वतंत्र विमानांनी दिल्लीत पोहोचले. संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील अशी या सहा लोकसभा खासदारांची नावे आहेत. हे खासदार दिल्लीला पोहोचताच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बुधवारी सकाळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि त्यांना वेगळा गट स्थापन करुन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होणार असल्याची माहिती दिली. या खासदारांनी त्यांच्या स्वाक्षऱ्या असलेले एक पत्रही बिर्ला यांना सुपूर्द केले. त्यावरून फूट पडल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
रात्रभर नाट्यामय घडामोडी
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे लोकसभा खासदार फुटणार, हे मंगळवारी रात्रीपासूनच स्पष्ट झाले होते. मुंबईत खासदारांची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची लगबग होत होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर या खासदारांना दिल्लीत नेण्याचे उत्तरदायित्व सोपविण्यात आले आहे, अशी वृत्ते येत होती. त्यांनीच या खासदारांसाठी दोन विमानांची सोय करून दिली अशी चर्चा आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर अडीच वाजता चार खासदार या दोन विमानांमधून दिल्लीकडे निघाले. संजय दिना पाटील हे खासदार पहाटे स्वतंत्र विमानाने दिल्लीला जाण्यासाठी निघाले. ओमराजे निंबाळकर हे पहाटेपर्यंत घरीच होते, असे त्यांच्या पत्नीने नंतर स्पष्ट केले. ते पहाटे विमानाने निघाल्याचे समजते.
एकनाथ शिंदेही दिल्लीत
सर्व खासदार दिल्लीला जाण्यासाठी निघाले आहेत याची शाश्वती झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील विमानाने दिल्लीकडे निघाले. सकाळी 11 वाजण्याच्या आसपास या सर्वांची दिल्लीत भेट झाली. त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष बिर्ला यांची भेट घेण्यात आली. एकनाथ शिंदे हे मुंबईहून थेट दिल्लीला गेले नाहीत. ते गुजरात आणि राजस्थान येथे थांबत दिल्लीत पोहचले, असे समजते.
पक्षातंर बंदी कायदा
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे लोकसभेत 9 खासदार आहेत. त्यांच्यापैकी 6 खासदारांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधीगृहातील एखाद्या पक्षाचे दोन तृतियांश सदस्य पक्षातून बाहेर पडून त्वरित अन्य नोंदणीकृत पक्षात प्रवेशल्यास त्यांना पक्षांतरबंदी कायद्याची बाधा होत नाही. या नियमाचे पालन या खासदारांनी केल्याने त्यांच्या खासदारपदांचे संरक्षण होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांच्या प्रवेशाची अधिकृत आणि प्रकट घोषणा अद्याप करण्यात आली नसली, तरी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे स्पष्ट आहे.
आता आमदारांची चिंता
लोकसभेतील खासदार फुटीचे हे लोण महाराष्ट्राच्या विधानसभेतही पोहोचणार, अशी चर्चा आता होत आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे 20 आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत आहेत. त्यांच्यापैकी किमान 15 आमदार फुटण्यासाठी सज्ज आहेत. ही संख्या 16 इतकीही असू शकते. मात्र, त्यांची नावे काय आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण येत्या दोन-तीन दिवसांमध्ये उद्धव ठाकरे यांना आमदारही धक्का देऊ शकतात, असे आता निश्चित मानले जात आहे. आमदार फुटण्याची प्रक्रिया त्वरीत होणार नाही. पण ती निश्चित होणार, अशी जोरदार चर्चा आहे.
संजय राऊत यांची आगपाखड
उबाठा शिवसेनेतून बाहेर पडलेल्या सहा लोकसभा खासदारांसंबंधी या पक्षाचे नेते संजय राऊत यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत अत्यंत अश्लाघ्य आणि शेलकी भाषा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासंबंधीही त्यांनी अश्लाघ्य टिप्पणी केली. गुजरातचे हे दोन व्यापारी जोपर्यंत सत्तेत आहेत, तोपर्यंत चोरीमारी, लबाडी असे उद्योग होतच राहतील, अशी भाषा त्यांनी उपयोगात आणली. हिंमत असेल तर या खासदारांनी खासदारपदाचा त्याग करावा आणि निवडणुकीच्या संग्रामात यावे, असे आव्हानही राऊत यांनी दिले. हे लोक उद्धव ठाकरे यांच्यामुळेच खासदार झाले. आता त्यांनी विश्वासघात केला आहे. त्यांच्यासंबंधात मी जी भाषा उपयोगात आणली, ती वृत्त प्रसारित करताना आहे तशीच राहू द्या. ती झाकू नका, असे आवाहन त्यांनी पत्रकारांनाही केले.
प्रत्येकाला 15 कोटी अॅडव्हान्स...
फुटणाऱ्या प्रत्येक खासदाराला 15 कोटी रुपये आगाऊ देण्यात आले आहेत. तसेच त्यांना नंतर प्रत्येकी 35 कोटी रुपये मिळणार आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. हा प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा सौदा झाला असून त्यामुळेच फूट पडली, अशी भाषा त्यांनी केली. तथापि, कोणत्या खासदारांना इतकी रक्कम मिळाली, असा प्रश्न विचारताच त्यांनी खासदारांची उच्चारण्यास नकार दिला.
मुंबईचे नगरसेवक सांभाळा...
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार फुटण्याची चर्चा होत असतानाच महानगरपालिकांमधील नगरसेवक तरी टिकून राहतील का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई महानगरपालिकेत 65 नगरसेवक आहेत. ते तरी तुमच्याकडे राहतात का बघा, असे जाहीर आव्हान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी दिले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतही उबाठा शिवसेनेची पडझड होणार काय, या चर्चेला प्रारंभ झाला आहे. मुंबई सोडून या पक्षाचे नगरसेवक अन्य महानगरपालिकांमध्ये नगण्य संख्येने आहेत. पण जे, आहेत, ते तरी राहतील काय, असा प्रश्न आता राजकीय तज्ञही विचारु लागले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची अवस्था तृणमूल काँग्रेससारखी होईल अशी शक्यता दिसत आहे.
नाही भाजपचा संबंध
उबाठा शिवसेनेत ज्या घडामोडी घडत आहेत, त्यांचा भारतीय जनता पक्षाशी कोणताही संबंध नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून खासदार आणि अन्य कोणी बाहेर पडत असतील, तर ते त्यांचे उत्तरदायित्व आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षावर आरोप करणे किंवा टीका करणे अनुचित आहे. असे आरोप केल्याने परिस्थिती सुधारणात नाही, असा प्रतिवार भारतीय जनता पक्षाने केला.
खासदार काय म्हणतात...
या सहा खासदारांनी मोहाला बळी पडून उबाठा शिवसेना सोडल्याच्या आरोप फेटाळला आहे. उबाठा शिवसेना पक्ष निष्क्रीय झाला आहे. पक्षनेते उद्धव ठाकरे आम्हाला वेळही देत नाहीत. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही यामुळे निराशा पसरली असून या पक्षाला भवितव्य उरलेले नाही. म्हणून आम्ही वेगळा मार्ग स्वीकारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे हे विकासाला प्रतिबद्ध असून त्यांचे हात बळकट करण्याचा आमचा हेतू आहे. आमच्या मतदारसंघांमधील कामे होणेही महत्वाचे आहे. आम्ही विकासासाठी हा मार्ग स्वीकारला असून आम्ही कायदेशीर मार्गाने जात आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांच्यापैकी काहींनी व्यक्त केली.
उबाठा शिवसेनेचेही भवितव्य डळमळीत...
ड तृणमूल काँग्रेसपाठोपाठ उबाठा शिवसेनेचेही राजकीय भवितव्य अधांतरी
ड मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकही पक्षांतरासाठी सज्ज असणे शक्य
ड या सर्व घडामोडींशी भारतीय जनता पक्षाचा संबंध नसल्याचे प्रतिपादन