प्रवीण मांजरेकरांच्या रूपाने पत्रकारितेतील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपले
सावंतवाडीतील शोकसभेत उपस्थितांनी व्यक्त केल्या भावना
सावंतवाडी । प्रतिनिधी
प्रवीण मांजरेकर आपणास सोडून गेले हे सहन न होणारे आहे. एक हाडाचा पत्रकार, उत्कृष्ट नाट्यकर्मी यासह ते एक उत्तम माणूस होते. त्यांच्या निधनाने सामाजाशी नाळ जोडलेलं, पत्रकारितेतील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपलं. त्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे अशा भावना कै.प्रवीण मांजरेकर यांच्या शोकसभेत उपस्थितांनी व्यक्त केल्या. तसेच कै. मांजरेकर यांचं कार्य अविरत जपण्यासाठी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्याचा मानस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी शोकभावना व्यक्त करताना बोलून दाखवला.
श्रीराम वाचन मंदिर येथील तालुका पत्रकार संघ आयोजित शोकसभेत कै. प्रवीण मांजरेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सुरुवातीला प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली अर्पण केली. तसेच स्तब्ध राहून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, ज्येष्ठ संपादक गजानन नाईक, माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर, सामाजिक कार्यकर्ते अँड नकुल पार्सेकर, माजी नगरसेवक राजू मसुरकर, प्रा.सुभाष गोवेकर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर, सार्वजनिक बांधकामचे विजय चव्हाण, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, उत्तम वाडकर, राजू तावडे, नंदू मोरजकर, सीताराम गावडे, भाग्यविधाता वारंग, राजेश मोंडकर, सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव, मंगल कामत, दिव्या वायंगणकर, मेघना साळगावकर, प्रकाश तेंडोलकर, रमाकांत गावडे, सचिन रेडकर, अँड. संतोष सावंत, अमोल टेंबकर, मयुर चराठकर, दीपक गांवकर, उमेश सावंत, अनिल भिसे, प्रसाद माधव,नरेंद्र देशपांडे, शैलेश मयेकर, विनायक गांवस, प्रवीण साठे, अजित दळवी, रामदास जाधव, संतोष परब, भुवन नाईक, साहिल दहिबावकर आदी उपस्थित होते.
प्रवीण मांजरेकर सोडून गेले हे सहन न होणारे असून एक हाडाचा पत्रकार, उत्कृष्ट नाट्यकर्मी एक उत्तम माणूस गेला याच दुःख आहे. त्यांच्या रूपानं पत्रकारितेतील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपलं आहे. क्रिकेटच्या मैदानात खेळताना त्यांनी आपला देह ठेवला. भुमिकेत शिरून, झोकून देऊन काम करणारं हे व्यक्तिमत्त्व आम्हाला अकाली सोडून गेलं अशी भावना ज्येष्ठ संपादक गजानन नाईक यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार अण्णा केसरकर म्हणाले, क्रिकेट सामन्यात सावंतवाडीचा संघ जिंकावा म्हणून मेहनत घेणारा हा कॅप्टन मैदानात कोसळला. अर्ध्या तासानं तो सोडून गेल्याची बातमी आली. प्रवीणच हे अकाली जाणं मनाला चटका लावणारं होतं. आपल्या मुलांसाठी धडपड करणारा बाप आम्ही त्याच्यात पाहिला आहे. अल्पावधीतच त्यांने आपला ठसा उमटवला होता. ग्रामीण भागातून पुढे येऊन अनेक आव्हानांवर मात करून त्यानं स्वतःच विश्व निर्माण केलं. समाज घडविण्यासाठी त्यांचे योगदान मोठं होतं. निर्भिडपणे मत मांडणारा एक सच्चा पत्रकार आज हरपला आहे. प्रवीण मांजरेकर यांचे गुण, त्यांचं धैय्य अंगीकारा, हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल अशा भावना श्री. केसरकर यांनी व्यक्त केल्या. तसेच अँड. नकुल पार्सेकर, राजू मसुरकर, दिलीप भालेकर, सीताराम गावडे, राजेश मोंडकर, प्रकाश तेंडोलकर, रमाकांत गावडे, उत्तम वाडकर, अभिमन्यू लोंढे, अँड.संतोष सावंत, राजू तावडे, नंदू मोरजकर, विनायक गांवस आदींसह उपस्थितांनी भावना व्यक्त करत आदरांजली वाहिली.
वक्तृत्व स्पर्धेतून कै.मांजरेकर यांचं स्मरण !
कै. मांजरेकर हे एक चांगले अभिनेते, पत्रकार, निवेदक, परिक्षक, नाट्यकर्मी होते. त्यांचा हा वारसा पुढे जोपासण्यासाठी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धा घेण्याचा आमचा मानस आहे. येत्या मराठी भाषा दिनाला कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर यांच नाटक कै. मांजरेकर सादर करणार होते. नटसम्राट ते स्वतः साकारणार होते. मात्र, त्या आधीच ते आम्हाला सोडून गेले. त्यांच्या कार्याचा वारसा पत्रकार संघ पुढे घेऊन जाईल तसेच त्यांच्या कुटुंबियांसह या दुःखद्प्रसंगी ठामपणे उभा राहील असे भावोद्गार पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी काढले.